Press "Enter" to skip to content

मोरगिरी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन

स्व.प्रभाकर पाटील यांनी छ.शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे अन् रायगडबाबत केलेले काम जनतेपर्यंत पोहोचविण्यात शेकापक्ष कमी पडला : पंडीतशेठ पाटील यांची खंत

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायतीने केवळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला शेकापक्षाला मतदान करीत शेकापक्षाकडून आग्रहाने विकास साधला. आतापर्यंत शेकापक्षाला विकासकामांच्या बदल्यातच मते मागता आली आहेत. कारण शेकापक्षाचे रायगड जिल्हा परिषदेचे सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेले स्व.प्रभाकर पाटील यांनी कुलाबा जिल्ह्याचे रायगड जिल्हा नामांतर बॅ.अंतुले मुख्यमंत्री असताना घडवून आणले, रायगडावर चौघडा वाजविण्याची प्रथा सुरू केली. रायगडावर जिल्हा परिषदेतर्फे निवासव्यवस्था सुरू केली तसेच रोपवे होण्यापूर्वी रायगडावर पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना निमंत्रित केले, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या उमरठला विकास केला या सर्व शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक वारशासाठी केलेल्या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात शेकापक्षाचा कार्यकर्ता कमी पडला, अशी खंत अलिबागचे माजी आमदार पंडीतशेठ तथा सुभाष प्र. पाटील यांनी व्यक्त केली.

पोलादपूर तालुक्यातील मोरगिरी ग्रामपंचायत हद्दीतील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि उदघाटनं माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांच्याहस्ते करण्यात आली. मोरगिरी ग्रामस्थांची वार्षिक महापूजा आणि हळदीकुंकू समारंभानिमित्त विविध कामांचे उदघाटनांचे आयोजन माजी आ.पंडीतशेठ पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी शेकापक्षाच्या राजिप सदस्या सुमन कुंभार, सभापती नंदा चांदे, तालुकाचिटणीस एकनाथ गायकवाड, बोरावळे सरपंच वैभव चांदे, पुरोगामी युवक संघटनेचे चंद्रकांत सणस, मोरगिरी सरपंच शरद जाधव, माजी सरपंच जगन्नाथ वाडकर, खरेदीविक्री संघाचे संचालक अजित कंक, मनोहर पार्टे, निवृत्ती उतेकर तसेच काशिनाथ कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पोलादपूर नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगरसेविका आशा गायकवाड-हांडे यांचा माजी आ.पंडीतशेठ पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांनी रोजगार हमी योजनेतून कामे सुरू केल्यास ग्रामस्थांनाही पैसा मिळेल आणि रस्ते, वृक्षारोपण आणि अन्य मेहनतीच्या कामेदेखील होतील, असे मत मांडले. रायगड जिल्ह्याची राजधानी अलिबागलाच आहे ती महाडमध्ये आलेली नाही. त्यामुळे जिल्ह्याची कामे करायला अलिबागलाच यावे लागेल. आमदार होण्यासाठी पंडीतशेठचे आशिर्वाद घ्यायला पेझारीलाच आले होता. ढालकाठीला रस्ते विकासकामे यांची सुरूवात मिनाक्षीताईंच्या काळात शेकापक्षानेच केली होती, असा टोलाही यावेळी माजी आमदार पंडीतशेठ पाटील यांनी लगावला.

प्रारंभी प्रास्ताविकामध्ये सरपंच शरद जाधव यांनी, पंचवीस वर्षांत शेकापक्षासोबत राहिल्यानंतर आपल्या सरपंचपदाच्या कारकिर्दीची दीड वर्षे शिल्लक असताना शेकापक्षाने नळपाणीयोजनेचे काम केले तर पदाचे सार्थक होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

तालुका चिटणीस एकनाथ गायकवाड यांनी, आगामी काळात पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन्ही जागा लढता येईल, अशी विकासकामे करून कोणत्या जागेवर निवडणूक लढायची याची वाट पाहात असल्याने कार्यकर्त्यांनी मागीलप्रमाणे निवडणुकीसाठी सज्ज राहण्याची मानसिकता बाळगावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रमोददादा शिंदे यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.