नागोठण्याला पुन्हा एकदा बालेकिल्ला बनविण्यासाठी तरुणांनो कामाला लागा : खा. सुनील तटकरे
राजकारण करणाऱ्या सुप्रीम पेट्रोकेमला वठणीवर आणणार
सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
दत्ताजीराव तटकरे साहेबांच्या राजकारणाला १९७० च्या आसपास गती मिळाली त्यावेळी काही मोजकेच सहकारी त्यांच्यासोबत होते. तात्यासाहेब टकेंचे नाव त्यामध्ये अग्रणी होते. त्यानंतर परिवर्तनाची ताकद सुरु झाली. या ताकदीचा प्रभाव रोहा तालुक्यात त्यावेळच्या काँग्रेस पक्षामध्ये तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आला त्याचे जनक हे वांगणीतील म.ता.ठाकूर साहेब होते. आज नागोठणे विभागात तरुण फळीच्या माध्यमातून पक्षाची घौडदौड सुरु आहे. वांगणीतील असंख्य कार्यकर्त्यांचा आज राष्ट्रवादीत प्रवेश हे त्याचेच फलित आहे. त्यामुळे मधला एक अपवाद वगळता नागोठणे हा यापूर्वीही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता व आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत नागोठणेला पुन्हा एकदा बालेकिल्ला बनविण्यासाठी तरुणांनो कामाला लागा, माझी संपूर्ण ताकद तुमच्या मागे आहे असे वक्तव्य खासदार सुनील तटकरे यांनी केले.
नागोठण्याजवळील वांगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नवनिर्वाचित सदस्य एकनाथ ठाकूर यांच्यासह येथील वारकरी संप्रदायातील एक प्रमुक व्यक्तिमत्व ह.भ.प. दळवी गुरुजी, नागोठण्यातील प्रियदर्शनी चालक-मालक वाहतूक संस्थेचे संचालक शेखर ठाकूर, शंकर ठाकूर, भारतीय कामगार महासंघ कर्मचारी संघटनेचे सुप्रीम पेट्रोकेम कंपनी युनिट मधील उपाध्यक्ष कांचन ठाकूर, वांगणी गावातील मरीआई क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष दिलिप तेलंगे आदींसह वांगणीतील सुमारे ६५ कार्यकर्त्यांनी तरुणांचे स्फूर्तीस्थान आमदार अनिकेतभाई तटकरे व ना. आदितीताई तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यावेळी खा. तटकरे बोलत होते.
सुतारवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात संपन्न झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यास जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे, राष्ट्रवादीचे नागोठणे विभागीय नेते भाई टके, मधुकर ठमके, चंद्रकांत जांबेकर, माणगाव-महाड विधानसभा रा.कॉ. अध्यक्ष बाबुशेठ खानविलकर, युवती जिल्हाध्यक्ष सायली दळवी, विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, कृष्णा धामणे, दिलीप आवाद, विभागीय युवक अध्यक्ष प्रमोद जांबेकर, कार्याध्यक्ष दीपेंद्र आवाद, राजू शिंदे, किशोर कदम, किसन बोरकर, निवास पवार, अमित जांबेकर, अतुल काळे, राजेश पिंपळे, रोशन पारंगे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खा. सुनील तटकरे यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या तालुक्यातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर ठमके यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा उल्लेख करीत १९८४ सालच्या बॅ. अंतुले साहेबांच्या निवडणुकीत पतित पावन संघटनेचे विलास तुपेही निवडणूक लढवीत असल्याने आम्ही अंतुले साहेबांचे काम करीत असल्याने आपल्यावर हल्ला करायला आलेल्या गुंडांनी वरसगाव नाक्याऐवजी वाकण नाक्यावर केलेला हल्ल्यात आमडोशीतील तुळशीराम जांबेकर यांचा झालेला खून व देविदास गायकर यांना झालेली मोठी दुखापत व आपण त्यावेळी एका दुसऱ्याच ठिकाणी पूजेकरिता गेलो असल्याने कशाप्रकारे वाचलो तसेच या हल्ल्याची माहिती मिळताच नागोठण्याहून तात्यासाहेब टके यांनी वडिलकीच्या नात्याने कोलाड येथे आपल्या घरी येऊन मला कुठेतरी दूर पाठविण्यासाठी माझ्या आईला सांगितले अशा आठवणींना यावेळी खा. तटकरे यांनी उजाळा दिला. मी आज दुपारीच दिल्लीला जाणार होतो, मात्र भाई टकेंनी मला या प्रवेश सोहळ्यासाठी थांबण्याचा आग्रह केल्याने व दिल्लीला जाताना एकनाथ ठाकूर यांना पक्षात घेऊनच जायचे ठरविल्याने मी थांबलो. तसेच औद्योगीकरणाचा जसा फायदा होत असतो तसाच काळत-नकळत तोटा कसा होतो हे सुप्रीम पेट्रोकेम कंपनीच्या निमित्ताने अनुभवायला येत असल्याने आठ दिवसांनी दिल्लीवरून आल्यानंतर राजकारण करणाऱ्या सुप्रीमला वठणीवर आणले जाईल व ज्याप्रमाणे आमडोशी येथील श्री माणकेश्वर मंदिराच्या तलावाच्या रूपाने विभागातील तलावांच्या शुशोभीकरणाच्या कामांची सुरुवात करून वांगणी ग्रामपंचायतीमधील वाड्या-वस्त्यांवर विकासगंगा पोहोचविली त्याचप्रमाणे तुम्ही सुरुवात करा मग बघा वांगणीवरही आपला झेंडा फडकेल असा विश्वास खा. तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांना दिला.
आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सुप्रीम कंपनीला सुरुवातीच्या काळात तटकरे साहेबांचे कसे सहकार्य मिळाले त्याची माहिती दिली. आणि आज जर सुप्रीम कंपनी आपल्या इथे असतांनाही येथील तरुणांना धाटाव, महाड वा पाताळगंगा अशा लांब ठिकाणी नोकरी करण्यास जावे लागत असेल तर भविष्यात नोकरी बरोबरच सुप्रीममध्ये स्थानिकांना इतर कामेही कशी मिळतील यासाठी साहेबांच्या सहकार्याने पुढील दिशा ठरविण्यात येईल असे स्पष्ट केले. यावेळी एकनाथ ठाकूर यांनी सांगितले की, आ. अनिकेतभाई यांची काम करण्याची पद्धत दोन भेटीतच समजल्याने प्रभावित होऊन आपण आपल्या सहकाऱ्यांसह हा प्रवेश करीत असून भविष्यात पंचक्रोशीत राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आणणार असे बोलून त्यांनी त्यांच्यासोबत प्रवेश करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर ठाकूर यांनी केले.








Be First to Comment