कडाक्याच्या थंडीमुळे नवी मुंबईत हृदयविकार व श्वसनविकारात झाली वाढ
सिटी बेल | ठाणे – नवी मुंबई |
गेल्या चाळीस वर्षांचा विक्रम मोडत थंडीने यावर्षी नवीन विक्रम केला असून हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी थंडी तापदायक झाली आहे. वाढत्या थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावत असल्याने हृदयाला होणारा रक्ताचा पुरवठा विस्कळीत होतो. तसेच, सकाळी लवकर केला जाणारा व्यायाम, शारीरिक हालचालींमुळे हृदयावर ताण येऊन हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे हृदयविकाराच्या पेशंटने थंडीत पहाटे व्यायाम अथवा शारीरिक हालचाली करू नये, असा सल्ला हृदयविकार तज्ज्ञांनी दिला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना नेरुळ येथील शुश्रूषा हार्ट केयर व स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदयशल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले , ” नवीन वर्षे सुरु झाले आहे त्यामुळे अनेकांचा वजन वाढवणे अथवा घटविण्याचा मानस असतो, परंतु हृदयविकाराच्या पेशंटने थंडीत पहाटे व्यायाम अथवा शारीरिक हालचाली करू नये कारण पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास असलेल्या अनेकांना त्याचा फटका बसण्याची शक्यता अधिक असते. थंडी आणि हृदयविकाराचा झटका यांचा परस्परसंबंध आहे. थंडीत शरीरातील हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या आंकुचन पावतात. शरीरातील सर्व रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयविकाराचा पूर्वी कोणाला त्रास असेल, तर थंडीमध्ये हा धोका कैक पटीने वाढतो. अनेकांना आपल्याला हृदयविकार आहे हे माहित नसते त्यामुळे पूर्वीपासून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेज) असल्यास त्यात थंडीत वाहिन्या आंकुचन पावल्याने हृदयाला रक्तपुरवठा विस्कळित होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. गेल्या महिन्याभरात हृदयविकार रुग्णांमध्ये १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असून यामध्ये पन्नाशीतील नागरिकांचा समावेश आहे. प्राणायम करताना महिला कोसळण्याची घटना नाशिकमध्ये ताजी असताना ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात १० तरुणांना जिममध्ये मृत्यू आला आहे.
हृदयविकारासोबतच श्वसनविकारात सुद्धा वाढ झाली असल्याचे निरीक्षण तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे करण्यात आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरचे फुप्फुसरोगतज्ञ डॉ अभय उप्पे म्हणाले, ” मुंबई व लगतच्या उपनगरांत नागरिकांना ३० ते ३५ डिग्री तापमानाची सवय असणाऱ्या नागरिकांना अचानक हवेतील बदलांमुळे त्रास होत आहे.. सध्या मुंबई आणि नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर धुरक्याचे साम्राज्य पसरले आहे. या धुरक्यामध्ये वाहनांचा धूर मिसळत असल्याने ‘क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) अर्थात काळ्या दम्याच्या श्वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा गर्भवती महिलांभोवती पडत आहे. गर्भवती मातांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना थंडीमध्ये वारंवार सर्दी, पडसे, खोकला, ताप व कीटकांपासून होणाऱ्या आजारांची लागण लगेच होऊ शकते. गेल्या महिनाभरात गर्भवती महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली असून, ही संख्या भविष्यात वाढेल. सध्या मोठ्या प्रमाणात तयार होत असलेल्या धुरक्यामुळे गर्भवती महिलांना धाप लागणे, छातीत जळजळ होणे तसेच न्युमोनियाची लागण होऊ शकते व अशा प्रकारच्या पेशंटची संख्या आजमितीला वाढत आहे. वातावरणात असलेले हे धुरके श्वसन मार्ग, सायनस आणि अनुनासिक पोकळी उपनिर्मित करतो व त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये रोगजन्य जिवाणू पसरू शकतात.”








Be First to Comment