वर्क फ्रॉम होमच्या गदारोळात पालकांचा पाल्याशी तुटतोय संवाद
सिटी बेल | मुंबई |
कोरोना महामारीमुळे लहान मुलांमध्ये विविध प्रकारचे आजार पाहायला मिळत असून ३ वर्षे उलटून गेली तरी अनेक मुले स्पष्ट बोलत नसल्याचे दिसून आले आहे. बाळ जसजसे मोठे होत जाते तस तसे आई वडील त्याचा आवाज ऐकण्यासाठी अधीर होतात मुलाचे बोबडे बोल त्यांना एक वेगळाच आनंद देतो . सहसा मुले एक वर्षानंतर हळूहळू बोलायला सुरुवात करतात. स्पष्ट नसले बोलत तरी कानावर सततचे शब्द पडल्याने आणि आपल्या ओठांच्या हालचाली ओळखून ते बोलण्याचा प्रयत्न करतात. परंतु एका सर्वेक्षणानुसार गेल्या दोन वर्षात १ ते ३ वर्षाच्या बालकांना ” स्पीच डिले ” म्हणजेच उशिरा बोलण्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. हेच प्रमाण युरोपियन देशामध्ये २.५ टक्क्यांनी वाढले आहे.
याविषयी अधिक माहिती देताना घाटकोपर येथील झायनोव्हा शाल्बी हॉस्पिटलतर्फे बालरोगतज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ डॉ. श्रुति घटालीया म्हणाल्या ” गेली दोन वर्षे आपण सर्वजण बंदिस्त वातावरणात वावरत आहोत, खासकरून लहान मुलांना आपण खूपच जपत आहोत, याच बंदिस्त वातावरणाचा विपरीत परिणाम लहान मुलांच्या बोलण्यावर झाला आहे. सोशल गॅदरिंग, इतर मुलांसोबत खेळणे तसेच वेगवेगळ्या नातेवाईकांच्या संपर्कात येण्याचे प्रमाण थांबल्यामुळे बोलण्यास उशीर होत आहे.
१८ महिन्यांपर्यंत मूल पप्पा, मम्मी बोलू लागते परंतु जर तुमचे बाळ दोन वर्षे होऊनही किमान २० ते २५ शब्द बोलत नसले वा अडीच वर्षाचा होऊनही दोन वाक्य बोलत नसेल तसेच साधे शब्द बोलताना सुद्धा त्याला अडचण होत असेल वा तो विसरत असले तर हि सगळी स्पीच डिलेची लक्षणे आहेत.पालकांनी यात घाबरून जाण्याचे कारण नसून यावर चांगल्या थेरपी उपल्बध आहेत व त्यासाठी त्यांनी लहान मुलांच्या डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.
आजमितीला अनेक पालक सुद्धा कोरोना महामारीमुळे मानसिक त्रासातून जात आहेत त्यामुळे त्यांचे मुलांकडे थोडे दुर्लक्ष होत आहे, अनेकवेळा आपले मुल बोलत नसल्यामुळे कथित उपचार सुरु करतात त्यामुळे या चुकीच्या उपचारामुळे मुलांना बोलायला अजून उशीर होतो.बाळाच्या स्पीच आणि लेन्ग्वेज डेव्हलपमेंट मध्ये आसपासचे वातावरण महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. जर कोणी बाळाशी बोललच नाही तर बाळ तरी कसे बोलेल याचा पालकांनी विचार करणे महत्वाचे आहे. वर्क फ्रॉम होम सुद्धा याला कारणीभूत असून अनेक वेळा बऱ्याच पालकांना घरी असून सुद्धा आपल्या मुलांना वेळ देता येत नाही. “
विद्याविहार येथे राहणाऱ्या शैलजा कुंटे यांचे मूल २ वर्षाचे असून त्यांचे पती विदेशात काम करतात, लॉकडाउनमुळे त्यांचे पती विदेशात अडकले होते व त्या सुद्धा लॉकडाउनमुळे एक ते दीड वर्षे बाहेर जाऊ शकल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या मुलामध्ये स्पीच डिलेची समस्या जाणवू लागली. यावर त्यांनी तात्काळ डॉक्टरांचा ऑनलाईन सल्ला घेऊन स्पीच थेरपी सुरु केल्या व त्यांचे मुल आता व्यवस्थित बोलू लागले आहे.
कोरोना महामारी व लॉकडाउन याचा विपरीत परिणाम सर्व वयोगटातील मुलांवर झाला असून या मुलांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपचार करणे फार महत्वाचे आहे, आपले मूल जर इतरांपेक्षा वेगळे वागत असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा असे मत बालरोगतज्ञ आणि नवजात रोग विशेषज्ञ डॉ. श्रुति घटालीया यांनी व्यक्त केले.








Be First to Comment