शिवरायांनी आक्रमणांना दिलेले उत्तर प्रेरणादायी — सागर सुर्वे
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
शिवराय कायम सर्वांसाठी स्फूर्तिदायी ठरतात. आतापर्यंत देशावर अनेक आक्रमणे झाली. या आक्रमकांनी देश आणि हिंदू धर्माची प्रचंड लूट केली. त्याला येथील राजांनी प्रत्युत्तरही दिले. मात्र, अफझल खान चालून आला असता त्याला त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले उत्तर हे देशाविषयी प्रेरणादायी होतेच, पण धर्मासाठी असलेले कार्यही मोठे होते. शिवाजी महाराजांच्या कार्याचा उल्लेख इंग्रजांनीही केला. त्यापूर्वीही आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली. त्यात सर्वात पहिले आक्रमण आपल्या परिसरातील ठाणे आणि दिवा या ठिकाणी झाले. मात्र ते येथील हिंदू राजांनी परतून लावले. असे मत इतिहास संशोधक सागर सुर्वे यांनी व्यक्त केले.
लक्ष्मीकांत वाचनालय व ग्रंथालयाच्यावतीने इतिहास संशोधक सागर सुर्वे यांचे ‘देशभक्ती आणि छत्रपती शिवराय’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी, माजी नगराध्यक्षा रजनी गायकवाड, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की, लक्ष्मीकांत सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष दीपक बेहेरे, कार्याध्यक्ष पद्माकर गांगल, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील आदी मान्यवरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सुर्वे पुढे म्हणाले, ‘कर्जत परिसराला मोठा इतिहास असून त्याच्या पावलोपावली खुणा दिसतात. कोकणात असणारे बापदेवाची राऊळं म्हणजे आपले संरक्षक होते, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, कर्जत तालुक्यात 18 घाट मार्ग असल्याने देश आणि कोकणाला जोडणारा दुवा आहे. कर्जत शहरातून जाणारी उल्हास नदी ऐतिहासिक आहे. याच नदीच्या मुखाशी कल्याण येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना केली. त्याचप्रमाणे कोंढाणे लेणी, कोथळीगड लेणी यांसह देऊलवाडी, गौरकामथ या ठिकाणी असलेल्या पाऊलखुणाही त्यांनी सांगितल्या. त्याचे संरक्षण आणि संवर्धन केले जात आहे.








Be First to Comment