सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील राजकीय व आर्थिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपुर्ण मानल्या जाणाऱ्या परळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश चंद्रकांत ठाकुर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच ॲड. प्रविण कुंभार यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी महेश ठाकुर यांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासिन अधिकारी सरपंच संदेश कुंभार यांनी तरुण तडफदार व कार्यकुशल नेतृत्व महेश ठाकुर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
२०१८ साली परळी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक झाली. या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया या तीन पक्षांची परिवर्तन महाविकास आघाडी होऊन शिवसेनेच्या विरोधात निवडणुक लढविण्यात आली. सदर निवडणुकीत परिवर्तन महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला. यावेळी ठरविण्यात आलेल्या धोरणाचा एक भाग म्हणून दरवर्षी एका सदस्याला उपसरपंच पद देण्यात येते. पहील्याच वर्षी आरपीआयचे दीपक गायकवाड यांना संधी दिली. त्यानंतर ॲड. प्रविण कुंभार यांची निवड केली गेली. ॲड. प्रविण कुंभार यांनी एक वर्षाचा कालावधी संपल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्याने महेश ठाकुर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित उपसरपंच महेश ठाकुर यांच्या रुपाने दुधाणेवाडी गावाला परळी ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून प्रथमच उपसरपंचपद मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. महेश ठाकुर हे अन्यायाविरूध्द पेटून उठणारे कार्यकर्ते असून सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आहेत. आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी ते देत असलेले योगदान वाखाणण्याजोगे आहे. राजकारण व समाजकारणात समतोल रोखून काम करणारे महेश ठाकुर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याने त्यांचे परळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सदस्या, ग्रामसेवक ए. एम. खेडकर यांच्यासह अमोल देसाई, विठ्ठल सिंदकर, सुनिल गायकवाड, प्रकाश आवासकर, राहुल गायकवाड, सतिश पवार, नितेश गायकवाड, सुरज शिंदे, शेखर डोंगरे, धर्मेंद्र आंदेकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. आपण सर्वांनी जो विश्वास दाखवला, व उपसरपंच पदी संधी दिली.त्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करून यापुढेही जनसेवेसाठी अविरत झोकून देऊन काम करण्याचे महेश ठाकूर यांनी आश्वस्त केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना सरपंच संदेश कुंभार यांनी अनेक बाबींचा परामर्श घेऊन २०१८ साली झालेली निवडणुक ही अत्यंत अटीतटीची होती. या निवडणुकीत आम्ही बलाढ्य शक्तीविरूध्द लढून विजय मिळविला आहे. परळीकरांनी ज्या उद्देशाने आम्हाला निवडून दिले त्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. आज परळी ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत व यापुढेही करणार असल्याचे सांगितले. शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य विठ्ठल सिंदकर यांनी सांगितले की परिवर्तन महाविकास आघाडीकडून समाधानकारक काम होत असून सरपंच संदेश कुंभार व आघाडीचे अध्यक्ष अमोल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आघाडी कार्यकाल पुर्ण करेल. माजी उपसरपंच दीपक गायकवाड यांनी विरोधकांना चिमटे काढीत कुणीही आघाडीत बिघाडी होण्याची स्वप्ने पाहू नयेत. आमची आघाडी मजबूत आहे असे सांगितले. रिपब्लिकन नेते सुनिल गायकवाड यांनी सरपंच संदेश कुंभार यांच्यासह त्यांच्या सर्व सदस्यांचे चांगल्या प्रकारे काम करीत असल्याबद्दल अभिनंदन केले व यापुढेही विकासकामे करण्यासाठी असेच सहकार्य करावे असे आवाहन केले.
शेवटी नवनिर्वाचित उपसरपंच महेश ठाकुर यांनी सरपंच संदेश कुंभार, ॲड. प्रविण कुंभार, आघाडीचे अध्यक्ष अमोल देसाई, विठ्ठल सिंदकर, प्रकाश आवासकर, सुनिल गायकवाड, सर्व सदस्य व सदस्या यांचे उपसरपंचपदाची संधी दिल्याबद्दल आभार मानून सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे अभिवचन दिले.






Be First to Comment