भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाचा सन्मान पनवेलला !
विक्रांत बाळासाहेब पाटील नवे प्रदेशाध्यक्ष …
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच जाहीर केली. पक्षाची पुढील वाटचाल व राजकीय समीकरणे याचा विचार करून अनेक सक्षम व्यक्तींना या कार्यकारणी मध्ये स्थान देण्यात आले आहे . भाजपामध्ये महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या युवा मोर्चा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद हे पनवेलचे माजी उपमहापौर व नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांच्या रूपाने रायगड जिल्ह्यातील पनवेल ला प्राप्त झाले आहे . संघटनेत अनेक वर्ष प्रभावीपणे आणि निष्ठेने काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला हे पद दिले गेल्याने महाराष्ट्रातील युवा मोर्चा कार्यकर्त्यांमध्ये अतिशय उत्साहाचे व समाधानाचे वातावरण आहे .
या पूर्वी विक्रात बाळासाहेब पाटील हे भाजपा युवा मोर्चाचे राज्याचे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते , तसेच ते पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक सुद्धा आहेत . एक कार्यतत्पर लोकप्रतिनिधी , जनतेशी नाळ जोडलेले युवा नेतृत्व , अभिनव पद्धतीने उपक्रम राबविण्याची कार्यशैली अभ्यासू व्यक्तिमत्व , उत्तम वक्ता प्रभावीपणे विषयाची मांडणी करण्याचे कौशल्य अशी विक्रांत पाटील यांची जनमानसात ओळख आहे . महाराष्ट्र राज्य भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी आपली कारकीर्द प्रभावीपणे पार पाडली आहे.महाराष्ट्रभर प्रवास करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटना बांधणीसाठी त्यांनी यापूर्वी प्रचंड मेहनत घेतलेली आहे . तसेच महाराष्ट्रभरातील युवा विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच आक्रमक राहिले आहेत . यापूर्वी राज्याचे माजी कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष असताना विक्रांत पाटील त्यांच्यासोबत राज्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यानंतर माजी ग्रामविकास मंत्री पंकजा ताई मुंडे महाराष्ट्राच्या अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकारणी मध्ये त्यांना थेट राज्य सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली होती व त्यानंतर हडपसर चे आमदार योगेश अण्णा टिळेकर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाल्यावर त्यांनीही विक्रांत पाटील यांची संघटन सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली होती . विक्रांत पाटील हे वयाच्या सोळाव्या वर्षापासून म्हणजेच विद्यार्थीदशे पासूनच राजकारणात सक्रिय झाले . त्यांनी भाजपाचा एक कार्यकर्ता म्हणून सलग अठरा वर्ष सामाजिक कार्यात स्वतःला समर्पित केले आहे . त्यामुळे अगदी तळागाळा पासूनच्या कामाचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे . विक्रांत पाटील हे भाजपा नेते बाळासाहेब पाटील यांचे सुपुत्र आहेत बाळासाहेब पाटील यांनी रायगड जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये संघर्ष करत सतत ४० वर्ष पक्षाला वाढवण्याचे काम निस्वार्थीपणे केले अगदी पडत्या काळात जिल्ह्यात पक्ष संघटना बांधण्याचे काम अत्यंत परिश्रम घेत , पक्षनिष्ठा जपत त्यांनी केले आणि त्यामुळेच विक्रांत पाटील यांना संघर्ष परिश्रम आणि पक्षनिष्ठा याचे बाळकडू त्यांच्याकडून लहानपणापासूनच प्राप्त झाले आहेत . सुरुवातीला पनवेल विद्यार्थी मोर्चा ची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली . त्यानंतर पनवेल तालुका युवा मोर्चा व नंतर रायगड जिल्हा विद्यार्थी मोर्चाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश सचिव , सलग दोन वेळा प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या आहेत आणि आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे मोठ्या जबाबदारीचे पद त्यांना देण्यात आले आहे.एक कार्यकर्ता ते प्रदेश अध्यक्ष हा त्यांचा प्रवास खरंच खूप कौतुकास्पद आहे . विक्रांत पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की हे पद म्हणजे बहुमान नसून एक जबाबदारी आहे आणि या माध्यमातून परिश्रम घेऊन महाराष्ट्रातील युवांचे प्रश्न सोडविण्याचे काम मी करणार आहे . तसेच माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून ही महत्त्वपूर्ण जबाबदारी दिल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व सर्वच वरिष्ठ नेत्यांचे आभार व्यक्त करीत असल्याचे ही त्यांनी सांगितले .
Be First to Comment