मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोडची रूंदी कमी असताना पूर्वेकडील सर्व्हिस रोडवरून मुंबईकडे तसेच कोकणाकडे जाणारी वाहतूक करताना फेरीवाल्यांचा अडथळा होत असल्याची लेखी तक्रार भारतीय जनता पक्षाचे वाहतूक सेल पोलादपूर तालुका प्रमुख विश्वास नलावडे यांनी केली आहे. पोलादपूर नगरपंचायतीमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन ही लेखी तक्रार सादर केली आहे.
याप्रसंगी वाहतूक सेल पोलादपूर तालुका प्रमुख विश्वास नलावडे, जिल्हा कमिटी सदस्य राजन धुमाळ, माजी राजिप सदस्य अनिल नलावडे, मंगेश शिंदे, नितीन बोरकर, योगेश भोसले, आबा बनसोडे इत्यादी उपस्थित होते.
पोलादपूर शहरातून अंडरपास जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या वरील बाजूने नियोजित सर्व्हिसरोड जात असून सध्या पूर्वेकडील सर्व्हिसरोडवरूनच कोकणात जाणाऱ्या तसेच कोकणातून येणाऱ्या वाहनांची दुहेरी वाहतुक सुरू असते. ही वाहतूक भविष्यातही पूर्वेकडील सर्व्हिसरोड वरूनच होत राहणार हे गृहित धरून या सर्व्हिसरोडवरील फेरीवाले, वडापाव तसेच अन्य टपऱ्या दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वाहतुक सेलचे अध्यक्ष विश्वास नलावडे यांनी तक्रार अर्ज केला आहे. यावेळी नगरपंचायतीमध्ये कार्यालयीन अधिक्षक महादेव सरंबळे यांनी सदर अर्ज मुख्याधिकारी रोडगे यांना पुढील कार्यवाहीसाठी अवलोकनासाठी देण्याची ग्वाही दिली.








Be First to Comment