श्वानदंशापासून सुटकेसाठीची कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम निष्फळ ?
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
दर पावसाळ्यामध्ये पोलादपूर शहरवासियांना कुत्र्यांच्या चाव्यामुळे हैराण होण्याच्या घटना घडत असताना पोलादपूर नगरपंचायतीने तीन वर्षांपूर्वी स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम सुरू करून नागरिकांना श्वानदंशापासून दिलासा देण्याचा उपक्रम सुरू केला. मात्र, त्यानंतरही श्वानदंशाच्या घटना घडल्या असून कुत्री व्यायल्याचे ठिकठिकाणी दिसून आल्याने ही कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम निष्फळ ठरून या मोहिमेमध्ये भ्रष्टाचार घडला आहे का, याबाबत प्रश्चचिन्ह निर्माण झाले आहे.
तीन वर्षांपूर्वी पहाटेच्या सुमारास पोलादपूर शहरातील तब्बल 23 कुत्र्यांची धरपकड सोसायटी ऑफ ऍनिमल प्रोटेक्शन या कोल्हापूर येथील संस्थेच्या सहकाऱ्यांमार्फत करण्यात येऊन स्व.बाळासाहेब ठाकरे सभागृहात नेण्यात आले. याठिकाणी कुत्र्यांना जनरल अनेस्थेशियाचा डोस देऊन गुंगीमध्ये ठेऊन ऍण्टीरेबीज व्हॅक्सीन, ऍण्टीबायोटिक्स लसीकरण करून झाल्यानंतर निर्बिजीकरणाची छोटीशी शस्त्रक्रिया केली गेल्याची माहिती सचिन देऊळकर या पशूवैद्यकीय उपचारतज्ज्ञांकडून प्रस्तुत प्रतिनिधीस देण्यात आली. या निर्बिजीकरण आणि लसीकरणानंतर कुत्रा चावल्यानंतर रेबीज होण्याचा धोका कमी असतो, कुत्र्यांच्या निर्बिजीकरणानंतर त्यांच्या हालचाली मंदावून कुत्रा धष्टपुष्ट होतो तसेच कुत्र्यांच्या आक्रमकतेला पायबंद बसून पिसाळण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील भटक्या कुत्र्यांप्रमाणेच विनापरवाना तसेच खासगीरित्या कुत्रा पाळणाऱ्यांबाबतही नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयास माहिती दिल्यास अशा कुत्र्यांचेही निर्बिजीकरण अथवा ऍण्टीरेबीज व्हॅक्सीनेशन करण्यात येणार असल्याने किमान वर्षभर या कुत्र्यांच्या चाव्याचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे शक्य होणार असल्याचे त्यावेळी पशूवैद्यकीय उपचारतज्ज्ञ सचिन देऊळकर यांनी सांगितले होते.
पोलादपूर शहरातील पाळीव आणि मोकाट कुत्र्यांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया तसेच ऍण्टीरेबीज व्हॅक्सीनेशन करण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी सहकार्य केले. पोलादपूर शहरातील अंदाजे 200 ते 250 मोकाट कुत्री असल्याचा प्राथमिक अंदाज असून सोसायटी ऑफ ऍनिमल प्रोटेक्शन,कोल्हापूर या संस्थेच्या स्वयंसेवकांमार्फत कुत्र्यांची धरपकड करण्यात आली.
पोलादपूर शहरातील कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेची पाहणी तत्कालीन नगराध्यक्ष निलेश सुतार, तत्कालीन उपनगराध्यक्ष सिध्देश शेठ, माजी शहरप्रमुख सुरेश पवार, ज्ञानदेव पार्टे आदींनी करून पशूवैद्यकीय उपचारतज्ज्ञ सचिन देऊळकर यांच्या सोसायटी ऑफ ऍनिमल प्रोटेक्शन या संस्थेच्या कामाची पाहणी केली होती. मात्र, त्यानंतर एका माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याने माहितीच्या अधिकारामध्ये मागितलेल्या माहितीनुसार पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये 2019 मध्ये 83 जणांना श्वान दंश झाला तर 2020 मध्ये 94 जणांना श्वानदंश झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. याखेरिज, पोलादपूर शहरातील आनंदनगर, भैरवनाथनगर तसेच अन्य भागामध्ये अनेक मादी कुत्र्यांनी पिल्ले जन्माला घातल्याची दृश्यं रस्त्यावर पाहायला मिळाल्याने श्वानदंशापासून सुटकेसाठीची कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम निष्फळ ठरली आहे अथवा कसे, असा सवाल निर्माण झाला असून याप्रकरणी कुत्री व्यायली अथवा चावली तर भ्रष्टाचार होतो अथवा कसे, याबाबत नगरपंचायत पोलादपूरच्या प्रशासनाने उत्तर देण्याची गरज निर्माण झाली आहे.








Be First to Comment