मोहोपाडा तलाव सुशोभीकरणात समाजकंटकांचा अडथळा
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मोहोपाडा तलावाच्या सुशोभीकरणासाठी उरण विधानसभा आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून गार्डन व ओपन जीम साठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर काम अंतिम टप्प्यात आले आहे . गार्डनसाठी बांधण्यात आलेल्या कंपाऊंडचे ५० लोखंडी अँगल कोणीतरी ” समाजकंटकांनी वाकवून नुकसान केले आहे . याबाबत गार्डनचे काम घेतलेल्या ठेकेदार शरद शिर्के यांनी रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे .
मोहोपाडा परिसरातील नागरिकांसाठी एक चांगल्या प्रकारचे गार्डन व्हावे , त्यांना आपल्या कुटूंबासह त्या गार्डनमध्ये चांगल्या प्रकारे वेळ घालवता यावा यासाठी आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून ३० लाखांचे गार्डन मंजूर करण्यात आले आहे . तसेच तरुण व सर्वच वयोगटातील नागरिकांना आपले स्वास्थ उत्तम राखता यावे यासाठी १० लाख रुपयांचे ओपन जीम मंजूर करण्यात आले आहे . या दोन्ही विकासकामांमुळे मोहोपाडा परिसरातील नागरिकांना चांगला फायदा होणार आहे . परंतु काही समाजकंटकांना ही विकासकामे न पहावल्याने त्यांनी गार्डन कंपाऊंडसाठी उभारण्यात आलेल्या लोखंडी अँगल वाकवून नुकसान केले आहे . सदर बाब भाजपाचे विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल यांना सदर ठेकेदाराने सांगितली व रसायनी पोलीस ठाण्यात नुकसान करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांच्या विरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे .
आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून मोहोपाडा परिसरात करोडो रुपयांची विकासकामे होत आहेत . परंतु काही जणांना ती पहावत नसल्याने सदर व्यक्ती असली कृत्य करत असल्याचा आरोप सचिन तांडेल यांनी केला आहे .
विकासकामांत कुणीही राजकारण न आणता आपल्या परिसराचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.आज मोहोपाडा परिसरातील नागरिकांना सुसज्ज गार्डन व ओपन जीम मिळणार असल्याने विघ्नसंतोषी लोकांनी कृपया या विकासकामांना अडथळा आणू नये असे सचिन तांडेल यांनी सांगितले .
मोहोपाडा तलाव सुवोभिकरण गार्डंनचे कंपाऊंडचे लोखंडी अँगल वाकवून विकासकामात बाधा आणणाऱ्या समाजकंटकांचा मी निषेध करतो.
— सचिन तांडेल, भाजपा वासांबे जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष








Be First to Comment