पेण मधील आठ दुकान फोडीतील तीन आरोपींना अटक
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण शहरात मागच्या महिन्यात एकाच रात्री चोरट्यांनी आठ दुकाने फोडून पोबारा केला होता त्या गुन्ह्यातील तीन आरोपींना पेण पोलिसांनी अटक केली असून आज त्यांना पेण न्यायालयात हजर केले असता २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सदर चोरट्यांकडून काही मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.
पेण शहरातील पेण खोपोली मार्गावरील जलाराम मेडीकल स्टोअर्स, डिमोलोज केक शॉप, साई राज स्वीट मार्ट, रिंगरोड स्टोअर, स्वरा कलेक्शन, चिंतामणी जनरल स्टोअर, चावडीनाका येथील आईस्क्रीम पार्लर व मोबाईल शॉपी या आठ दुकानांचे शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी १२ डिसेंबरच्या मध्यरात्री ३६ हजार रुपये रोख रक्कम व एक मोबाईल असा ऐवज घेऊन पोबारा केला होता.यात चोरी करणारे चोरटे हे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते.
तपासाअंतर्गत पेण पोलिसां समोर चोरांना पकडण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.त्यातच चार पाच दिवसांपूर्वी पेण शहरातील सनसिटी बिल्डिंग मध्ये असणाऱ्या एसबीआय बँकेच्या एटीम वर चोरट्यांनी दरोडा टाकून ५६ लाख ३४ हजार ८०० रुपये घेऊन गेल्याने पेण पोलिसांवर दबाव वाढला होता.अखेर अथक प्रयत्न करुन पेण पोलिसांनी आठ दुकानातील चोरी प्रकरणी रवी तानाजी धनगर (वय १९) रा.आंबिवली-कल्याण, राज विजय राजापूरे (वय २१) रा.मध्यप्रदेश-इंदोर, सुनील रामधरण गोयल (वय 19) आंबिवली-कल्याण या तीन आरोपींना अटक करण्यात आलीअसून यातील चौथा संशयित आरोपी बाळकृष्ण पाल हा ठाणे,नौपाडा येथे अटक आहे.मात्र त्याला याकडे वर्ग करण्यात येणार आहे.
सदर आरोपींना पेण न्यायालयात हजर केले असता त्यांना २५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. यात आरोपीं कडून ५ हजार ३०० रुपये रोख रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक तपास रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्रीमती मीनल शिंदे या करीत आहेत.








Be First to Comment