Press "Enter" to skip to content

रोहा कोलाड रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा

औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यालगत दुकाने थाटल्याने कारखाने दिसेनासे

वाढत्या दुकानांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ.अतिक्रमण रोखण्यात प्रशासन अपयशी

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे |

मुंबई गोवा महामार्गाला कोलाड येथे मिळणाऱ्या ११ किलोमिटर अंतराच्या रोहा कोलाड रस्त्यावर मागील कित्येक वर्षापासून अतिक्रमणांचा विळखा वाढत आहे.तर धाटाव औद्योगिक वसाहती अतर्गत रस्त्यालगत बहुतांशी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दुकान गाळे थाटून अतिक्रमणाचा सपाटा लावला.रस्त्याला दुतर्फा बाजूने दुकान गाळे अतिक्रमण वाढत राहिल्याने अनेक कारखाने मात्र आता दिसेनासे झाले आहेत.

ही वाढती अतिक्रमणे रहदारीला जणू डोकेदुखी ठरत असल्याने हुकूमशाही करून अतिक्रमने केली असली तरी याचा परिणाम येथे रोजीरोटी साठी विविध गावागावातून आलेल्या कामगार वर्गाला याचा त्रास सोसावा लागत आहे.दिवसा आड होत असलेले अपघात पाहता दोन्ही ठिकाणची अतिक्रमणे रोखण्यात मात्र प्रशासन सपशेल अपयशी ठरले असल्याचे येथील स्थानिक नागरिकातून बोलले जात आहे.

या वाढत्या अतिक्रमण समस्येबाबत पालकमंत्री आदिती तटकरेंशी चर्चा सुद्धा झाली मात्र त्यांनी ही गंभीर बाब फारशी मनावर घेतलेली नाही.अखेर दखल घेत एमआयडीसी प्रशासनाने वरिष्ठ विभागाशी पत्रव्यवहार सुरू केला.अनेक कंपन्यांचे प्रथमदर्शनी भाग अतिक्रमणाच्या गाळे विळख्यात जाण्याचे विदारक दृश्य असतानाच रोहा कोलाड राज्य महामार्ग रस्त्यालाही अतिक्रमण गाळे, झोपड्यांनी वाढता घेराव सुरूच ठेवल्याचे समोर आले.

जैनवाडी नाक्यावर तर एका प्रतिष्ठित व्यक्तीने अक्षरशः रेल्वे सारखे एका मागोमाग एक असे जणू डब्बे उभारून गाळे बांधून भाड्याने देण्याचा महाप्रताप केला आहे.दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग व औद्योगिक विकास महामंडळाची जागा दोन्ही बाजूने गिळंकृत केली असल्याचे पहावयास मिळते.याउलट रोहे शहर व जेएसडब्ल्यू कंपनीला जाणाऱ्या जलवाहिन्या याठीकानच्या गाल्याना धक्का न लागता समोरून टाकण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त झाले.

त्यामुळे या अतिक्रमणाला नेमके संरक्षण कोणाचे ? हे सुद्धा एकदा जगासमोर आले.तर बडे नेतेच अतिक्रमण करणार्‍यांना पाठीशी घालतात हेच पुन्हा एकदा स्पष्ट झाले.सार्वजनिक बांधकाम विभाग व औद्योगिक विकास महामडळाच्या अधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या खऱ्या मात्र अतिक्रमण करणार्‍यांना राजकीय पाठबळ असल्याने दिवसेंदिवस स्थिती गंभीर होण्याचे संकेत मिळत आहे.त्यातच अतिक्रमण गाळयातील कार्यालयाचे उद्घाटन चक्क एखाद्या आमदारानेच केल्याने त्यांचा अतिक्रमणाला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.शासनाची जागा पाहता हे चाललंय तरी काय?असा प्रश्न आता समोर आला आहे.

रोहा कोलाड रस्ता आणि औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यालगत दुतर्फा सुरू असलेली अतिक्रमण हटविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सबंधीतांना वारंवार फक्त नोटीस दिल्या खऱ्या.मात्र राजकीय पाठबळ असल्याने वाढती अतिक्रमणे सुसाटच सुरू आहेत.

दरम्यान,कंपन्या अंतर्गत रस्ता दुतर्फा अतिक्रमण गाळे, रोहा कोलाड रस्त्याकडेच्या अतिक्रमण दुकान गाळे वाढतच राहिल्यास भविष्यात गंभीर दृश्य दिसेल, हे विचारात घेता आतातरी कठोर पाऊले उचलावीत असा गर्भित इशारा सिटीझन फोरमचे निमंत्रक प्रदीप (आप्पा)देशमुख यांनी दिला.तर धाटाव औद्योगिक वसाहती अंतर्गत एक्सेल स्टॉप ते डीएमसी कंपनीच्या समोरील रस्ता अतिक्रमण दुकान गाळ्यांनी विद्रूप केला.याबाबत औद्योगिक विकास महामंडळाचे अभियंता जाधव यांना विचारणा केली असता प्रत्येकजण दुसऱ्याकडे बोट दाखवून देतो.कारवाई करायची कोणावर ?अशी हाताश भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान वाढत्या अतिक्रमणाबाबत आम्ही वरिष्ठांशी पत्रव्यवहार केला आहे,अशी टिप्पणही जाधव यांनी केली.

दरम्यान कारखान्यासमोरील रस्त्याकडचे अतिक्रमण,रोहा कोलाड रस्ता दुतर्फा अतिक्रमण गाळे हटविण्याच्या कारवाईला आतातरी सर्वच लोकप्रतिनिधीनी पाठबळ द्यावे.सदर अतिक्रमणाबाबत लोकप्रतिनिधीं काय भूमिका घेतात ? हे स्पष्ठ होणार आहे.वाढत्या अतिक्रमणाने धाटाव सारख्या गजबजलेल्या ठिकाणी सतत गर्दी बरोबर वाहतूककोंडीला भविष्यात सामोरे जावे लागेल,ही गंभीर बाब विचारात घेता संबधीत प्रशासनही काय निर्णय घेतो ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.