सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |
नागोठण्याजवळील वांगणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत शेकाप, राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीचे उमेदवार एकनाथ ठाकूर ( मते ३३२) यांनी मनसे उमेदवार हिराचंद दळवी ( मते २८२) यांचा ५० मतांनी दणदणीत पराभव करून विजय संपादन केला.
दरम्यान आघाडीचे उमेदवार एकनाथ ठाकूर यांचा विजय झाल्याचे वृत्त समजताच राष्ट्रवादीचे नेते भाई टके, राष्ट्रवादीचे नागोठणे शहर अध्यक्ष बाळासाहेब टके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विभागीय अध्यक्ष प्रमोद जांबेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विनय गोळे, वांगणीचे माजी उपसरपंच एकनाथ जांबेकर, नागोठणे ग्रा. पं.चे सदस्य राजेश पिंपळे आदींसह आघाडीच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनाथ ठाकूर यांचे अभिनंदन केले.
आघाडीचे विजयी उमेदवार एकनाथ ठाकूर वांगणी गावात पोहचताच आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून विजयी जल्लोष साजरा केला. यानंतर विजयी उमेदवार एकनाथ ठाकूर यांची गावातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. विजयी मिरवणुकीत ह.भ.प. दळवी गुरुजी, शंकर ठाकूर, लहू तेलंगे, रमेश भिसे, चंद्रशेखर ठाकूर, किशोर कदम, लीलाधर भिसे, एकनाथ दळवी, यशवंत यादव, नरेश दळवी, दिलीप तेलंगे, मनोज जाधव, कांचन ठाकूर, पांडुरंग जाधव, सचिन भालेराव, राजू मोरे, मोहन मांडे आदींसह आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.
अनिकेतभाई तटकरेंचा पायगुण
नागोठणे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मतदानापूर्वी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी नागोठण्यात भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होऊन त्याचा परिणाम म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पिंपळे विजयी झाले होते. त्याचप्रमाणे वांगणी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील मतदानापूर्वी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी वांगणीत येऊन आघाडीचे उमेदवार एकनाथ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या होत्या. अशा प्रकारे राजेश पिंपळे यांच्या पाठोपाठ एकनाथ ठाकूर यांचाही पोटनिवडणुकीत विजय झाल्याने आमदार अनिकेतभाई तटकरे यांचाच हा पायगुण असल्याची चर्चा विभागात होत आहे.








Be First to Comment