Press "Enter" to skip to content

उप वनसंरक्षक रायगड कार्यालयासमोर आदिवासींचे आमरण उपोषण

जिल्ह्यामध्ये सुमारे १६० आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्ह्यातील रायगड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोर आदिवासींचे आमरण उपोषण सुरू झाले असून त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांच्या अभावामुळे त्यांच्यावर आमरण उपोषण करण्यास भाग पडले आहे.

आज भारत देश वासीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी सण साजरा करत असताना रायगड जिल्ह्यातील आदिवासी मात्र मूळ सुविधांपासून वंचित आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे १६० आदिवासी वाड्या वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे रस्ता वीज पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

अश्याच वाडयांपैकी पनवेल तालुक्यातील आपटा ग्रामपंचायत हद्दीतील कोरललवाडी आदिवासी वाडीच्या रस्त्याची प्रशासकीय मंजुरी मिळून मागील दीड वर्षापासून निधी पडून आहे.

परंतु वनविभाग अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर आज दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी कोरलवाडी येथील ग्रामस्थानीं ग्राम संवर्धनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याचे उप वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

मागील दीड वर्षांपासून आदिवासींच्या रस्त्याचा निधी विना वापर असाच पडून आहे. मात्र वन विभाग जाणीव पूर्वक टाळाटाळ करीत असल्यामुळे अश्या वन अधिका-यांवर सेवा हमी कायदा व दप्तर दिरंगाई कायद्यानुसार कारवाई करून तात्काळ मंजूरी दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते गुरुदास वाघे, भानुदास पवार, हरिश्चंद्र वाघे, संतोष पवार, सचिन वाघे, महेंद्र वाघे, राजेश वाघे, अनिल वाघे, अक्षय घाटे, सुनील वाघे, रवींद्र वाघे, लक्ष्मण पवार आणि रमेश वाघे यांनी केला आहे.

आपटा ग्राम पंचायतीचे उप सरपंच वृषभ धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य मारुती चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते दर्शन भोईर एडवोकेट आकाश मात्रे ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे प्रकल्प समन्वयक उदय गावंड यांनीही या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.