महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेना अध्यक्ष जितेंद्र पाटील यांची मागणी
सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) :
कोरोना महामारीचा मुंबईसह राज्यभरात प्रदूर्भाव वाढतच आहे. त्यासाठी सरकारी पातळीवर विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच, ‘अनलॉक 2’मध्ये काहीप्रमाणात वाहतूकही सुरू करण्यात आली आहे. मात्र, कोकणात सणांसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वे गाड्या उपलब्ध नसल्याने यंदा त्यांना आपल्या सणांना मुकावे लागणार आहे. त्यासाठी मध्य रेल्वेच्यावतीने कोकणासाठी विशेष गाड्या सोडण्याचे मागणीपर पत्र महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी दिले आहे.
श्रावण महिना सुरू झाला की मुंबईत काम करणाऱ्या चाकरमान्यांना सणांसाठी कोकणात जाण्याचे वेध लागतात. त्यासाठी रेल्वे, राज्य परिवहन यांसह मुंबईतील लोकप्रतिनिधी कोकणात जाणाऱ्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करते. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे सर्व जगच ठप्प झाले आहे. मराठी माणसाला प्रिय असलेल्या सणांवरही पाणी फिरले आहे. त्यातच गणेशोत्सव तोंडावर आल्याने सरकारकडून लॉकडाऊनबाबत नियम काहीप्रमाणात शिथिल केले असले तरी रेल्वे आणि राज्य परिवहनची सेवा ठप्पच आहे. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, मध्य रेल्वेच्यावतीने लांबपल्ल्याच्या विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, त्याचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणताही फायदा नाही. त्यामुळे या गाड्यांना कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा. याबाबत, कार्यवाही न केल्यास आणि आंदोलन सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वे प्रशासन याला जबाबदार असेल असे जितेंद्र पाटील यांनी मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.






Be First to Comment