कायस्थ ज्ञातिरत्न पद्मभूषण राम प्रधान यांचे निधन
सिटी बेल लाईव्ह/ मुंबई
भारताचे माजी केंद्रीय गृह सचिव कायस्थ ज्ञाती रत्न पद्मभूषण राम प्रधान यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबई मधल्या कुलाबा येथील ललित या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते.
भारताच्या प्रशासकीय सेवेत विविध हुंद्द्यांवर काम करत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे महाराष्ट्र राज्याचे सचिव ते केंद्रीय गृह खात्यातील सचिव हा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. पंजाब, आसाम,मिझोराम येथील अस्थिरता निवरणाऱ्या समझोत्यांमध्ये प्रधान यांचा सिंहाचा वाटा होता. भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचे ते अत्यंत विश्वासू निकटवर्तीय समजले जात. प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रधान यांच्या अनन्यसाधारण सेवेमुळे 1987 साली भारत सरकार तर्फे त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी 2008 साली स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचे ते प्रमुख होते.
त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राष्ट्रवादी-काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विट करत दुःख व्यक्त केले. तसेच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राम प्रधान यांच्या निधनाचे वृत्त समजताच ट्विटर’वर दुःख व्यक्त केले.






Be First to Comment