माजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या तलावांचे काय झाले ?
राष्ट्रवादी चे युवा नेते दिनेश घाग यांचा सवाल

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठण्यातील सत्ताधाऱ्यांना खोटे आश्वासन देण्या पलीकडे काहीच करता येत नाही. हे सत्ताधारी आपण न केलेल्या कामाचे खोटे श्रेय घेण्यात पटाईत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांचा जोगवा मागण्या साठी शिवसेनेचे उमेदवार माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते नागोठण्यातील शुंगार तलावाच्या शुशोभीकरणाचे भूमिपूजन करण्याचा या सत्ताधारी लोकांनी देखावा केला परंतु सुमारे दिड वर्ष उलटून गेले तरी तो तलाव जैसे थे या स्थितीत आहे. माजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते शुशोभीकरणाचे भूमिपूजन झालेल्या त्या शुंगार तलावाचे काय झाले ? असा सवाल युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे शहर अध्यक्ष युवा नेते दिनेश घाग यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
दिनेश घाग यांनी सांगितले की, नागोठण्यातील शुंगार व कोंडाळ तलावाची अत्यंत दुर्दशा झालेली असून. तलावाच्या संरक्षणासाठी मी नागोठणे ग्रामपंचायततीकडे वारंवार मागणी तर केलीच आहे परंतु हा विषय ग्रामसभेत देखील मांडला आहे. परंतु आजतागायत या तलावांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्षच झालेले दिसून येते. हे तलाव अतिक्रमण व शेवाळीच्या विळख्यात सापडलेले आहेत. सदर तलावाचे अंदाजपत्रक तयार आहे, लवकरच काम चालू होईल अशी अनेक आश्वासने सत्ताधाऱ्यांकडून दिली जात आहेत. परंतू या गोष्टीवर आता जनतेचा विश्वास रहिलेला नाही. स्थनिक ग्रामपंचायत सदस्य यांचे सुद्धा याबाबतीत लक्ष राहिले नसल्यामळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सदर तलावात जिवितहानी झाली तर याला जबाबदार कोण ? असा सवाल यावेळी दिनेश घाग यांनी उपस्थित केला आहे. आता मी नागोठण्यातील अनेक प्रलंबित विषयांना वाचा फोडणार असून अनेक बाबतीत ग्रामस्थांना वेठीस धरण्याचे काम मी सत्ताधाऱ्यांना करू देणार नाही. तसेच नागोठण्यातील तलावांचे संंरक्षण करा. ग्रामस्थ तुम्हास आशिर्वाद देतील असा मौलिक सल्ला देखील यावेळी दिनेश घाग यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी नागोठण्याचे सरपंच डाॅ. मिलिंद धात्रक यांच्याशी मोबाईल वर वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याचे आढळून आले. त्यामुळे यासंदर्भात ग्रामपंचायतीची बाजू समजू शकली नाही.






Be First to Comment