माथेरानच्या वन ट्री हील पॉईंटला आलाय नवा लूक
सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान |
माथेरान मधील अनेक विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच जे मुख्य पाहण्याजोगे नयनरम्य पॉईंट्स आहेत की ज्यावरून निसर्गाच्या अदभुत लीलया अगदी सहजपणे पहाता येतील अशा केवळ दूर असणाऱ्या या पॉईंट वर काही वर्षांपासून येथील बहुतांश घोडेवाले आणि हातरीक्षा वाले जाण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करतात. अगदी जवळचे स्वयंघोषित पॉईंट दाखवून पर्यटकांची दिशाभूल आणि अव्वाच्या सव्वा रक्कम लाटण्यात अनेकांचा हातखंडा बनलेला आहे.
त्यामुळे अशा अनेक सुंदर पॉईंट वरील स्टॉल धारकांना पर्यटकांअभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या व्यवसायावर मोठया प्रमाणावर विपरीत परिणाम झालेला आहे. याकामी अशा पॉईंटसचे सुधारीकरणं आणि सुशोभीकरण नगरपरिषद आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे.यातील एक ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वन ट्री हील पॉईंटला नवसंजीवनी देण्यात आली असून ह्या एका नयनरम्य पॉईंटला इतिहासजमा होण्यापासून संरक्षण मिळाले आहे.
ह्या पॉईंटच्या भागात दगडगोटे आणि आजूबाजूच्या परिसरातील भाग अत्यंत खडकाळ होता त्याजागी आता जांभ्या दगडात आकर्षक रस्ता आणि दोहोबाजुला लोखंडी संरक्षक रेलिंग लावण्यात आली आहे.त्यामुळे अगदी जवळ जाऊन पॉईंटचा तळ सुध्दा पाहण्यात एक वेगळाच अनुभव याठिकाणी अनुभवायला मिळत आहे. समोर पनवेल येथील बहुतांश भाग तसेच शिवकालीन प्रबळ किल्ला, मोरबे धरण या पॉईंट वरुन अगदीच जवळ असल्याचा भास होतो याठिकाणी पर्यटकांना विश्रांती साठी हेरिटेज पध्दतीने दगडाचे बाकडे बनविले आहेत.
रुंद पायऱ्या त्याचप्रमाणे झाडांना संरक्षक कठडे, कचराकुंडी यामुळे या पॉईंटचा कायापालट झालेला असल्याने तेथील व्यावसायिकांच्या व्यवसायाला लवकरच तेजी प्राप्त होणार आहे. त्यामुळे निदान ह्या नयनरम्य पॉईंटचे देखावे पर्यटकांना पाहता यावेत जेणेकरून खऱ्या अर्थाने निसर्गाच्या सानिध्यात आल्याचा एक वेगळाच आनंद पर्यटकांना उपभोगता येऊ शकतो.

यापुढे तरी घोडेवाले, रिक्षावाले यांनी इमानेइतबारे नकाशावर ठळक असणारे पॉईंट पर्यटकांना दाखवावेत अशी अपेक्षा येथील सर्वच पॉईंट वरील स्टॉल धारक करीत आहेत.








Be First to Comment