
लोकशासन आंदोलन संघर्ष समितीने काढला मोर्चा
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार)
नागोठण्यातील रिलायन्स कंपनीने कोरोना संसर्ग रोगाच्या साथीचा गैरफायदा घेऊन कंत्राटी आणि कायम कामगारांवर अन्याय सुरू केलेला आहे तसेच कंत्राटी कामगारांमधील कोरोना रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या देखभाली संदर्भातही जो हलगर्जीपणा केला जात असल्यामुळे कंपनीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या विरोधात साथरोग प्रतिबंद कायदा १८९७ अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दि. ३१ जुलै रोजी सकाळी नागोठणे पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता.
कंपनी व्यवस्थापन कंत्राटी कामगारांच्या कोरोना टेस्ट आणि क्वॉरंटाईन करण्या बाबतीमध्ये भेदभाव करत असल्यामुळे भेदभावपूर्ण वागणुकी संदर्भातही फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी लोकशासन संघर्ष समितीच्या वतीने नागोठण्याचे पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
या मोर्चामध्ये प्रकल्पग्रस्त नलिकाग्रस्त कंत्राटी आणि कायम कामगार, निवृत्त कामगार यांच्यासह लोकशासन संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कामगारांकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर चेहऱ्याला मास्क, सोशल डिस्टन्सिंग, दोन व्यक्ती मधील किमान सहा फूट अंतर तसेच सॅनीटायझर यांचा वापर करून दक्षता घेण्यात आली होती.
यावेळी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीचे संघटक राजेंद्र गायकवाड, नागोठणे शाखेचे अध्यक्ष गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, मोहन पाटील, सोमनाथ पारंगे, सुभाष मढवी आदींच्या शिष्टमंडळा सोबत नागोठणे पोलिस ठाण्याचे निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी बैठक घेतली. शिष्टमंडळाकडून यावेळी पो.नि. घुटुकडे यांना एक निवेदन देण्यात आले. याप्रकरणी वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असे नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे यांनी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला यावेळी सांगितले.
या मोर्चा दरम्यान नागोठण्याचे पोलिस निरिक्षक दादासाहेब घुटुकडे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत तायडे, पाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक अजित साबळे, रोहा पोलिस ठाण्याचे उप निरिक्षक अतुल मडके यांच्यासह नागोठणे, रोहा, कोलाड व पाली या तीन पोलिस ठाण्यातील २५ पोलिस कर्मचा-यांसह चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.






Be First to Comment