Press "Enter" to skip to content

माथेरानचे रस्ते कधी होणार पुर्ण ?

अर्धवट कामांमुळे माथेरान मधील रस्त्यांवरून चालणे झाले कठीण !

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

माथेरान मध्ये धुळविरहित रस्ते व्हावेत जेणेकरून पावसाळ्यात होणारी मातीची धूप कमी करण्यासाठी पर्यावरण पूरक क्लेपेव्हर ब्लॉकच्या रस्त्याना मान्यता दिल्यामुळे गावातील अनेक भागात अशाप्रकारे रस्ते बनवण्यासाठी मागील दोन वर्षांपासून सपाटा सुरू आहे. त्यामुळेच सध्यातरी इथे तितकासा घोड्यांच्या लीद मिश्रित धुळीचा प्रादुर्भाव जाणवत नाही.धुळीचे प्रमाण कमी होत आहे. माथेरान मध्ये सर्वत्र लाल मातीचेच रस्ते पूर्वापार आहेत.याकामी पर्यटकांना सहज चालण्यासाठी, त्याचप्रमाणे हातरीक्षा चालकांना अधिक श्रम होऊ नयेत यासाठी हे रस्ते खास आकर्षण ठरत आहेत.

विविध ठिकाणी क्लेपेव्हर ब्लॉक रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत परंतु ही कामे पूर्ण करताना त्यावर नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधींचा अथवा अभियंत्यांचा कोणत्याही प्रकारचा अंकुश राहिलेला नसल्याने होत असलेली कामे खूपच घाईगडबडीने पूर्ण करून बिले काढण्यासाठी ठेकेदारांची लगबग होताना दिसते.या रस्त्यांच्या बाजुला पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी जांभ्या दगडात गटारे बनविली जात आहेत त्याठिकाणी सुध्दा आजूबाजूला असलेल्या हॉटेल समोरील जागेवर उंचवटा करून एकप्रकारे त्या त्या हॉटेल धारकांना संरक्षण दिले गेले आहे त्यामुळे हेच हॉटेल धारक काही दिवसांत त्याठिकाणी आपला हक्क बजावणार आहेत यात शंका नाही.

ज्या ज्या ठिकाणी हे रस्ते बनविताना लावण्यात येणारे ब्लॉक हे उत्तम दर्जाचे आहेत किंवा नाहीत याबाबत कुणालाही काहीएक स्वारस्य दिसत नाही.येथील हॉटेल प्रीती समोरील अशाच प्रकारच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी खूपच घाई केलेली दिसत असून त्याभागात ही कामे रात्रीच्या वेळी करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी ठेकेदारांनी उतार सुध्दा दिलेला नाही त्यामुळे या रस्त्याचे काम एकसंध नसून लावलेले ब्लॉक लवकरच पूर्णपणे सपाट झालेले दिसत आहेत. यावरून वर्दळ असल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत.

बहुतांश कामांची भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या पाट्या लावल्या नंतर त्या निकृष्ठ कामांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे.तर तेथूनच पेमास्टर पार्क कडे जाणाऱ्या रस्त्यावर ब्लॉक येण्याच्या अगोदरच अनेक महिन्यांपूर्वी त्याठिकाणी खडी अंथरून ठेवली आहे त्यामुळे हातरीक्षा चालकांना, घोडेवाले त्याचप्रमाणे पायी चालत जाणाऱ्या पर्यटकांना, त्या भागातील रहिवाशांना खूपच त्रासदायक बनलेले आहे. दोन वर्षांपूर्वी काही ठिकाणी असे रस्ते बनविताना थोडीशी जरी चूक आढळून आल्यावर स्वतःला इंजिनियर समजणा-या गावातील काही मंडळींनी मोठया प्रमाणावर आकांडतांडव केलेला होता ती मंडळी सद्यस्थितीत होत असणाऱ्या निकृष्ट कामांबाबतीत मूग गिळून का गप्प बसले आहेत की त्यांच्या बेभान सुटलेल्या जिभेवर कुणा ठेकेदारांमार्फत गुळाचा खडा तर ठेवला नाही ना असाही सवाल यानिमित्ताने नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

निदान आगामी काळात आणि यापुढे होणारी कामे चिरकाळ तग धरू शकतील अशाप्रकारे करावीत कारण या छोट्याशा गावाला आणि विशेष करून क वर्ग असणाऱ्या माथेरान नगरपरिषदेला सातत्याने भरीव निधी उपलब्ध होऊ शकत नाही.असे जेष्ठ नागरिकांमधून बोलले जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.