जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला भावाचा गोळ्या घालून खून : पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील घटना
सिटी बेल | पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील हनुमानपाडा येथील सख्या भावानेच आपल्या सख्या भावाची वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून गोळ्या घालून खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी पनवेल येथून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी संतोष राम पाटील (वय ४०) रा.हनुमानपाडा यांचे वडील राम हरिभाऊ पाटील व काका पांडुरंग हरिभाऊ पाटील रा.हनुमानपाडा यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपावरून वाद चालू होता. त्यानुसार दिनांक २६ डिसेंबर २०२१ रोजी परेश पांडुरंग पाटील व राम हरिभाऊ पाटील यांची पत्नी प्रभावती व मुलगा संतोष यांच्यामध्ये घरासमोर वाद झाला.
यादरम्यान पांडुरंग हरीभाऊ पाटील, परेश पांडुरंग पाटील व शैला पांडुरंग पाटील रा. हनुमानपाडा हे फिर्यादी संतोष राम पाटील यांच्या घराच्या अंगणात जाऊन त्यांनी राम पाटील यांना शिवीगाळ करून दमदाटी केली व पांडुरंग हरीभाऊ पाटील याने त्याच्याजवळ असणारी बारा बोर बंदुकीतून राम पाटील यांच्या छाती व पोटाच्या खाली गोळ्या झाडल्या. त्यात राम हरिभाऊ पाटील यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजताच आरोपी यांने तेथून पळ काढला.
सदर घटनेची माहिती मिळताच रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि या घटनेच्या तापसाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार दादर सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक भउड, भुसाने, पोलीस हवालदार मुंडे, कोकरे, जाधव, पाटील यांनी सदर गुन्ह्यातील फरार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पथक तयार करून यातील महिला आरोपी शैला पांडुरंग पाटील हिला ताब्यात घेऊन तिची सखोल चौकशी केली असता तिने फरार आरोपी पती व मुलगा हे पनवेल येथे गेले असल्याचे सांगितले.
त्याप्रमाणे तिच्या माहितीवरून सदर पथक पनवेल येथे जाऊन आरोपी पांडुरंग पाटील व परेश पाटील यांना काही तासातच ताब्यात घेऊन अटक करण्यात आले आहे.या घटनेची नोंद करून दादर सागरी पोलीस ठाण्यात भा. दं.वि. कलम ३०२/३४ सह. भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५/२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








Be First to Comment