पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी
उद्यापासून होणार नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरूवात !
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
नगरपंचायत पोलादपूरच्या 13 सर्वसाधारण प्रभागांच्या निवडणुकीसाठी मतदानप्रक्रिया पूर्ण झाली असताना आता नामाप्र प्रभागांचे आरक्षण सर्वसाधारण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चार प्रभागांची निवडणुकप्रक्रिया उद्या बुधवार दि. 29 डिसेंबर 2021 रोजीपासून सुरू होणार आहे. या चार प्रभागांच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तिरंगी आणि चौरंगी लढती रंगणार असून जागा जिंकण्यासाठी काही उमेदवार बदलण्यात येणार असून यशाची खात्री नसलेल्या 13 प्रभागातील एखाद्या उमेदवाराकडून दुसरी संधी मागितली जाण्याची लक्षणे दिसून येणार आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या 13 प्रभागांमध्ये काँग्रेस विरूध्द शिवसेना अशी प्रमुख पारंपरिक प्रतिस्पर्धी पक्षांची लढत सुरू असताना यंदा काँग्रेस सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूकपूर्व आघाडी झाली असून भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अखिल भारतीय सेना असे तीन पक्ष स्वतंत्ररित्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही राजकीय परिस्थिती उर्वरित 2, 8, 10 आणि 14 प्रभागांच्या अनारक्षित पदांच्या निवडणुकांदरम्यान कायम राहणार आहे.
पोलादपूर नगरपंचायतीच्या यापुर्वीच्या नागरिकांचा मागासप्रवर्ग आरक्षणाच्या प्रभाग 2 मधून शिवसेनेकडून माजी सरपंच मनोज प्रजापती, आणि काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडून कल्पेश मोहिते, प्रभाग 8 मधून सेनेकडून रिमा बुरूणकर तर आघाडीकडून अनिता जांभळेकर, प्रभाग 10मधून सेनेकडून संगिता इंगवले, आघाडीकडून शुभांगी चव्हाण, मनसेच्या प्रज्ञा सुर्वे, प्रभाग 14मधून माजी नगराध्यक्ष निलेश सुतार तर आघाडीकडून प्रकाश भुतकर आणि भाजपाकडून अंकिता जांभळेकर असे उमेदवारी अर्ज दाखल करून झाल्यानंतर छाननीमध्ये हे सर्व अर्ज वैध ठरले. याच उमेदवारांना पुन्हा नव्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, पक्षाने या उमेदवारांची उमेदवारी कायम ठेवण्याची आवश्यकता आहे.
21 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या मतदानप्रक्रियेमध्ये काही उमेदवारांचा निसटता पराभव होण्याची शक्यता असल्याने त्यांनी त्यांच्या पक्षांकडे पुन्हा उमेदवारी मागण्याची तयारी चालविली आहे तर काही इच्छुकांना पहिल्या 13 प्रभागांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्याने त्यांनीदेखील पक्षाकडे उर्वरित चार प्रभागांच्या निवडणुकीमध्ये संधी मागितली आहे. यामुळे चार प्रभागांतील नामाप्र आरक्षणावेळीचे उमेदवार नव्याने जाहिर झालेल्या अनारक्षित प्रभागांमध्ये कायम ठेवले जाण्याची शक्यता दुरावली आहे.
उद्या बुधवार दि. 29 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 दरम्यान नामनिर्देशनपत्र थेट अथवा निवडणुक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर सादर करायचे असून सुटीचे दिवस वगळता सकाळी तहसिल कार्यालयामध्ये थेट स्विकारले जाणार आहेत. दि. 4 जानेवारी 2022 रोजी छाननी आणि वैध ठरलेल्या अर्जांची यादी सकाळी 11 वाजल्यापासून प्रसिध्द करण्यात येणार आहे. नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी दि. 10 जानेवारी 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत असून दि.18 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया घेण्यात येणार आहे.
दि.21 डिसेंबर 2021 आणि दि. 18 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या मतदानप्रक्रियेची मतमोजणी बुधवार, दि. 19 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पोलादपूर तहसिल कार्यालयाच्या पहिल्या माळयावर होणार असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि सहायक निवडणूक अधिकारी तथा प्रभारी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिली.








Be First to Comment