Press "Enter" to skip to content

लाचखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी लाचलुचपत विभाग कार्यरत

5 वर्षात 44 धडक कारवाया : त्यातील 14 लाचखोर महसूल विभागातील

सिटी बेल | रायगड | दिपक पाटील |

काम करायचंय मग चहा पाणी द्यायला लागेल, त्याशिवाय काम होणार नाही ! असे लाच मागितल्याचे अनुभव सामान्य माणसाला सरकारी काम करताना येत असतात. मात्र अशा लाचखोर कोंबड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी लाचलुचपत विभाग कार्यरत असतो. जो लाच घेणाऱ्यां लोकसेवकांना अद्दल घडवत असतो. रायगड जिल्ह्यात लाचलुचपत विभागाने मागील अनेक वर्षात शेकडो कारवाया केल्या आहेत. त्यातील मागील पाच वर्षात 44 धडक कारवाया केल्या आहेत. त्यापैकी फक्त 14 लाचखोर हे महसूल विभागातील असल्याने जिल्ह्यात भ्रष्टाचारात महसूल विभाग अव्वल असल्याची चित्र आकडेवारीवरून दिसत आहे. दरम्यान नुकतेच भूमी अभिलेख येथे लाचलुचपत रायगड विभागाने कारवाई केली होती. त्यात लिपिकाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली होती.

लाच देणे आणि घेणे दोन्हीही गुन्हाच आहे. मात्र पैशाच्या हव्यासापायी लोकसेवक हे अपराध सर्रास करताना दिसतात. पहिलंच शासकीय काम आणि सहा महिने थांब अशी परिस्थिती आहे. लोक यासगळ्यातून पिचून निघाली आहेत. तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी कामासाठी खर्च करून यायचा. त्यातही काम झाल नाही म्हणून परत दुसऱ्या दिवशीचा फेरा. या फेऱ्यांमध्ये अडकलेला माणूस पाहता लोकसेवक हे काम तात्काळ करण्यासाठी लाचेची मागणी करतात.

अगोदरच कंटाळलेला व्यक्ती असा आणि तसा खर्चने विटलेला असल्याने तोही मान्य करतो. आणि इथून सुरवात होते ती भ्रष्टाचाराला. भ्रष्टाचाराला चटावलेले शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हे काही केल्या ऐकत नाही. ही मागणी क्षुल्लक पैशांवरून ते थेट लाखो रुपयांपर्यंत असते. भ्रष्टाचाराने देश पोखरून निघत असताना या लाचखोरांना धडा शिकवण्यासाठी शासनाचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग काम करत असतो.

या विभागाच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारी तक्रार आल्यास त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येते. तक्रारीची सत्यता पडताळून अवघ्या काही तासात सुद्धा कारवाई करण्यात येते. या विभागाच्या माध्यमातून तक्रार असलेल्या लोकसेवकासाठी सापळा रचला जातो. ज्यात पुराव्यानिशी लाचखोर लोकसेवक लाच मागताना अडकला तर त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग पिंपळभाट येथे असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात एकूण 44 कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये फक्त 14 फक्त महसूल विभागात आहेत. तर त्याखालोखाल भूमी अभिलेख 5, पोलीस 5, रायगड जिल्हा परिषद 4, रजिस्टर कार्यालय 3, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी 2, वन विभाग 2, आरोग्य विभाग 2 तर वजनकाटा, नगरपरिषद, जिल्हा ग्राहक, जेल, जिल्हामहिला बाल विकास यामध्ये प्रत्येक 1 अशी कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र एवढे असूनही भ्रष्टाचाराची कीड कमी होण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे जनतेने जागरूक राहून मी लाच देणार नाही ही शपथ घेऊन अशा लाचखोरांना धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे.

शासकीय कार्यालयात अनेकदा काम अडवून ठेवली जातात तर त्याबदल्यात लाचेची अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र आता सुशिक्षित समाजाने देशाची प्रगती होत आहे. त्यामुळे यावर्गाकडून अशा लाचखोरांना त्यांच्या योग्य जागी पोहचवले जात आहे. मात्र ग्रामीण भागात आजही जागृतीची गरज असल्याचे चित्र आहे.

आपल्याकडून लाच मागितली गेली तर थेट लाचलुचपत विभागाकडे करा तक्रार
सुषमा सोनवणे, पोलीस उपअधीक्षक, ( 9702706333)
किशोर साळे पोलीस निरीक्षक ( 9284389289 )
व्हॉटसअँप 9930997700
टोल फ्री 1064
तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली गेली तर लाच मागणाऱ्या विरोधात तक्रार देऊ शकतो. यामध्ये लोकसेवक किंवा खाजगी इसम जो लोकसेवकाच्या वतीने लाचेची मागणी करतोय किंवा ती स्वीकारतोय यांच्या विरूद्ध तक्रार केली जाऊ शकते.

शासकीय नोकराने भ्रष्टाचारकरून मोठ्या प्रमाणात स्वत:चे नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे, पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधन संपत्तीचा किंवा त्याच्या प्राप्तीच्या ज्ञात साधनांचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमविणे. याचा समावेश असंपदा प्रकारात केला जातो.

रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून लाचेच्या आल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करण्यात आलेली आहे. लोक आता हळूहळू पुढे येत आहेत, मात्र अजूनही नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. आपल्याला कोणत्याही कार्यालयात लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपली मदत नक्की करू
: सुषमा सोनवणे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत विभग रायगड

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.