समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणारा अवलिया – रुपेश होनराव.
स्वतःसाठी तर सारेच जगतात पण दुसऱ्यासाठी जगणारे खूपच कमी व्यक्ती या जगात आहेत. स्व कर्तृत्वाने अश्या व्यक्तीचा सुगंध चंदना प्रमाणे सर्वत्र दरवळत असतो. स्वतः साठी जगला तो मेला दुसऱ्यासाठी जगला तो जगला. या उक्ती प्रमाणे जगणारे, समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणारे अवलिया म्हणून मुंबई मधील डोंबिवली येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते, शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे राज्य सरचिटणीस रुपेश अशोक होनराव यांचा उल्लेख आवर्जून करावेसे वाटते.
रुपेश अशोक होनराव यांचा जन्म 26/12/1978 रोजी मुंबई मधील बहुसंख्येने असलेल्या मराठी भागातील गिरगांव येथे झाले. त्यांनी आपले शिक्षण संघर्ष मय जीवन जगत पूर्ण केले. त्यानंतर आईवडिलांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली.मुंबईतील भुलेश्वर येथे फुल विक्रीचा व्यवसाय आईवडील करत असत त्यात रुपेश होनराव हेही आपल्याला आईवडिलांना व्यवसायात मदत करत असत. नंतर स्व कर्तृत्वावर त्यांनी विविध व्यवसायात जम बसविला. हे सर्व संसारासाठी, कुटुंबासाठी करत असताना त्यांच्या मनातील समाजसेवेची तळमळ त्यांना गप्प बसू देत नव्हती. मुळातच रुपेश होनराव यांचा पिंडच समाजसेवेचा असल्याने हळू हळू त्यांनी आपल्या परीने आपल्या परिसरात गोरगरिबांना मदत करायला सुरवात केली.असे करत करत त्यांनी स्वतःला समाजसेवेत झोकून दिले. एकदा रक्त अभावी रुग्णाचे होत असलेले हाल बघून त्यांचे मन खूप दुखावले तेंव्हा त्यांनी 100 वेळा रक्तदान करण्याचा संकल्प केला. जे बोलले ते करणारच. जे निश्चय केला तो पूर्णत्वास नेणारच अश्यापैकीच रुपेश होनराव हे व्यक्तिमत्व असल्याने रात्री अपरात्री त्यांनी अनेक वेळा गोरगरिबांना रक्तदान केले आहे. रक्तदान करून मरणाच्या दारात असलेल्या अनेक रुग्णांचे त्यांनी प्राण वाचविले आहेत. रक्तदान करताना गरीब-श्रीमंत, लहान -मोठा, जाती धर्म याचा त्यांनी कधीही विचार केला नाही. माणुसकीच्या दृष्टीकोनातून गोरगरीब लोकांचे जीव वाचावेत, रक्ताच्या अभावी कोणाचे प्राण जाऊ नये, रक्तदान विषयी जनजागृती व्हावी या दृष्टीकोणातून रक्तदानाचे जागतिक समस्या लक्षात घेऊन रुपेश होनराव यांनी आजपर्यंत 70 वेळा रक्तदान केले.रक्तदान करताना कधीही कोणत्याही गोष्टीची अपेक्षा बाळगली नाही. निःस्वार्थ वृत्तीने त्यांनी हे माणुसकीचे कार्य केले. रक्तदानाची 100 री पार करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांचे समाजसेवेतील काम पाहता शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी रुपेश होनराव यांची निवड संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सरचिटणीस पदी केली. उत्तम वक्ता व उत्कृष्ट सूत्रसंचालक असल्याने त्यांनी अनेक उपक्रमात, विविध सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यक्रमात उत्तमरित्या सूत्रसंचालन केले. राज्याच्या रक्तदान चळवळीत त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद(SBTC)च्या वतीने 25/4/2010 रोजी रुपेश होनराव यांना सन्मानित करण्यात आले.श्री नागेश्वर मंदिर ट्रस्ट (गोल देऊळ )मुंबई तर्फे उत्कृष्ट रक्तदाता सत्कार, श्री क्षेत्र कपिलधार -जिल्हा बीड येथे दि 28/11/2012 रोजी शिवा संघटनेच्या वतीने महाराष्ट्र भूषण -उत्कृष्ट रक्तदाता हा मानाचा पुरस्कार, 51 वेळा रक्तदान झाले तेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तदान क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जानारा तसेच दानशूर कर्णच्या नावे दिला जानारा “राज्य स्तरीय रक्तकर्ण पुरस्कार ” प्राप्त, रक्तदान चळवळीत अग्रेसर असलेल्या रक्तानंद ग्रुप महाराष्ट्र तर्फे सन्मानित तसेच श्री गणेश मंदिर संस्थान डोंबिवली पूर्व, शिवनेरी मित्र मंडळ गोग्रासवाडी डोंबिवली पूर्व, चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली पूर्व, बसव सेवा मंडळ डोंबिवली पूर्व, यश चॅरिटेबल ट्रस्ट डोंबिवली पूर्व आदी विविध सामाजिक संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचा सन्मान केला आहे. सर्वधर्म समभावी असलेले रुपेश होनराव यांच्यावर वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असलेल्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे प्रथम ठाणे जिल्हाध्यक्ष व नंतर राज्याचे सरचिटणीस पदाची जबाबदारी दिल्याने त्यांनी ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार भागातील वीरशैव लिंगायत समाजाची एकसूत्रपणे बांधणी केली. विविध ठिकाणी विखुरलेल्या लिंगायत समाजाला त्यांनी एकत्र केले. वीरशैव समाज बांधवांना त्यांचे हक्क व अधिकाराची जाणीव करून दिली. वीरशैव लिंगायत समाजातील विविध समस्या, लोप पावत चाललेली शैव संस्कृती (शिव संस्कृती ), वीरशैव (शैव)पंथाचे समाजसुधारक, प्रसारक -प्रचारक क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर यांचे विचार व कार्य घराघरात पोहोचविण्याचे भगीरथ कार्य शिवा संघटनेच्या माध्यमातून रुपेश होनराव यांनी केले. 17 फेब्रुवारी 2012 ला महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करून स्वयंम सहायता महिला बचत गट स्थापन करण्यासाठी महिलांना प्रवृत्त करून त्यातून महात्मा बसवेश्वर महिला बचत गटाची स्थापना केली. ठाण्यातील मानपाडा येथील उड्डाणपुलाला महात्मा बसवेश्वर उड्डाणपूल असे नाव देण्यात यावे या मागणीसाठी कापूरबावडी ठाणे येथे 6/6/2012 रोजी रास्ता रोकोचे नेतृत्व केले. त्यात त्यांना एकदिवसाची पोलीस कोठडी सुद्धा झाली.
वीरशैव (शैव )संस्कृतीचे जतन, संवर्धन, संरक्षण व्हावे या दृष्टिकोणातून त्यांनी डोंबिवलीत 1/4/2012 रोजी शिवलिंग दिक्षा व जोडप्यांचे सामूहिक रुद्राभिषेक सोहळ्याचे आयोजनही केले होते. शिवभजन मंडळाच्या माध्यमातून अनेक घरात भजनही केले.कोरोना काळात किमान रात्रीचे कोणी गोरगरीब, गरजू व्यक्ति उपाशी राहू नये यासाठी स्वतःच्या खिशातील पैसे टाकून रुपेश होनराव यांनी गरजूंना जेवणाचे डब्बे दिले. आपला प्रत्येक वाढदिवस अनाथाश्रम, वृद्धाश्रमात साजरा करून त्यावेळी आश्रमातील व्यक्तींना विविध भेटवस्तूही दिल्या.शिवसंस्कृतीच्या अभ्यासासाठी त्यांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून श्रीलंका येथे परदेश दौरा केला. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबो शहरात श्रीरामाने बांधलेली शिवमंदिरे,महात्मा रावण यांची समाधी स्थळ, व तेथील शिवसंस्कृतीचा अभ्यास केला. त्यांचा ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा आज वीरशैव लिंगायत समाजातील तसेच इतर सर्व जाती धर्मातील लोकांनाही विविध माध्यमातून होत आहे. रक्तदानासह विविध पवित्र कार्यात येण्यासाठी युवकांना प्रोत्साहित करून विविध सामाजिक कार्यात सहभागी करून घेणे, वीरशैव भवन निर्मिती, समाज जागरूकता, रक्तदानाची शंभरी, होनराव कुलोत्कर्ष नावाने स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करणे आदी विविध संकल्प त्यानीं केले आहे. त्यांचा यंदा 26/12/2021 रोजी 44 वा वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा होणार आहे. विविध जातीधर्मात, समाजप्रबोधन करणारे,उत्तम वक्ता, उत्तम सूत्रसंचालक, एक आदर्श समाजसेवी निर्व्यसनी व सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले समाजसेवेचे दुसरे नाव म्हणजे रुपेश होनराव. वाढदिवसानिमित्त त्यांचा कार्याचा केलेला हा थोडक्यात आढावा म्हणजे त्यांच्या कार्याची ही ओळख आहे. समाजासाठी निःस्वार्थ वृत्तीने धडपडनाऱ्या या समाजसेवकाचा 26/12/2021 रोजी 44 वा वाढदिवस असल्याने त्यांना दीर्घायुष्य, संतती, संपत्ती, निरोगी आयुष्य, सुख समाधान लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. त्यांना पुढील वाटचालीसाठी व सामाजिक कार्यासाठी लाख लाख शुभेच्छा.
शब्दांकन -विठ्ठल ममताबादे
पत्रकार, लेखक, पोलिसमित्र
सामाजिक कार्यकर्ता, उरण, नवी मुंबई,
रायगड जिल्हाध्यक्ष -शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना सोशल मीडिया.
व्हाट्सअप नंबर -9702751098.
Be First to Comment