Press "Enter" to skip to content

कुंपणचं जेव्हा शेत खातं…

सुरक्षारक्षकांच्या मदतीने कंपनीतील कामगारांनी केली 28 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या मास्कची चोरी  

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

तळोजा एमआयडीसीतील व्हिनस सेफ्टी ऍन्ड हेल्थ प्रा.लि. कंपनीतील कामगार व सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या गोडाऊनमधील तब्बल 28 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 30 हजार एन-95 मास्कची चोरी करुन त्यांची बाहेर परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकिस आला आहे. तळोजा पोलिसांनी या चोरी प्रकरणातील कामगार व सुरक्षारक्षकांसह तीघांविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  

तळोजा एमआयडीसीतील व्हिनस सेफ्टी ऍन्ड हेल्थ प्रा.लि. या कंपनीत मास्क, गॉगल, एअरफ्लग इत्यादी वैयक्तीक सुरक्षा उपकरणे तयार केली जातात. कंपनीकडून तयार करण्यात आलेला माल कंपनीतील गोडाऊनमध्ये ठेवला जाऊन सदर मालाची आवक जावक नोंद केली जाते. सदर गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाकडून गोडाऊनमधुन बाहेर जाणाऱया तयार मालाची नोंद केली जाते. सदर कंपनीच्या गोडाऊन मधील कामगारांनी तेथील सुरक्षारक्षकांच्या मदतीने गोडाऊन मधून बाहेर जाणार्‍या मालाच्या बॉक्समध्ये जास्त बॉक्स टेम्पोत भरुन सदरचा माल बाहेर विकला.  

दरम्यान, कंपनीतील प्रमुख उत्पादक अधिकारी महेंद्र घाग व इतर अधिकाऱयांनी गोडाऊन मधील तयार मालाची तपासणी केली असता, तेथील मालामध्ये तफावत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे अधिकाऱयांनी गोडाऊन मधील सुरक्षा रक्षकाजवळ असलेले रजिस्टर व मुख्य गेटवरील आवक-जावक रजिस्टरची तपासणी केली असता, त्यात देखील मोठ्या  प्रमाणात तफावत असल्याचे आढळुन आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी स्टोअर मधील कामगार संतोष खंदारे याला विश्‍वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गोडाऊन मधील सुरक्षारक्षक व इतर कामगारांच्या मदतीने गोडाऊन मधून बाहेर जाणाऱया मालाच्या बॉक्समध्ये जास्त बॉक्स टेम्पोत भरुन ते बाहेर विकल्याचे सांगितले.

त्यानंतर कंपनीतील अधिकाऱयांनी स्टॉक लेजर, सीसीटीव्ही कॅमेरे व तयार मालाच्या बिलांची तपासणी केली असता, कंपनीतील कामगारांनी मागील तीन ते चार महिन्यामध्ये कंपनीच्या गोडाऊनमधील तब्बल 28 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 30 हजार एन-95 मास्कची चोरी केल्याचे आढळुन आले. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱयांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मास्कची चोरी करणारा कामगार संतोष खंदारे सह सुरक्षारक्षक व इतर कामगारांविरोधात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.