मतदारराजा पुन्हा पाच वर्षांसाठी विकासाच्या वल्गना ऐकण्यास सज्ज
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील शेवटचे शहर पोलादपूर येथील मतदारराजा नगरपंचायतीच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीनंतर पुन्हा एकदा विकासाच्या वल्गना ऐकण्यास सज्ज झाला आहे. अक्कलहुशारीच्या 13 लढतीमध्ये काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मनसे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षांच्या मतदारांना उल्लू बनविण्याच्या प्रयत्नांकडे सपशेल दूर्लक्ष करून सर्वच 13 प्रभागांतील मतदार आता पाचही राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या मेजवानीवर येथेच्छ ताव मारीत आहेत.
प्रभाग 1 बिनविरोध निवड टाळण्यात यश ; तरीही काँग्रेसचा पराभव निश्चित
प्रभाग 1 मध्ये अनपेक्षितपणे काँग्रेस उमेदवार मीनल जगताप विरोधात उभ्या ठाकल्याने बिनविरोध निवडून येण्याची अपेक्षा असलेल्या माजी नगराध्यक्ष सुनीता पार्टे यांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. शिवसेनेने या प्रभागातून इच्छुकांना अडीच अडीच वर्षांची संधी देण्याचे ठरवले होते. मात्र, या प्रभागात बिनविरोध निवडणूक होण्याची खात्री असताना अचानक येथून काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने चुरस निर्माण झाली आहे.

पोलादपूरच्या उत्तरेकडून प्रभाग रचनेचा निर्देश पाळून ही प्रभागरचना करण्यात आली आहे. प्रभाग 1 मध्ये पार्टेकोंड, सावंतकोंड,रामनगर या लोकवस्तीचा समावेश असून येथून शिवसेनेच्या सुनीता पार्टे या माजी नगराध्यक्षा निवडून आल्या आहेत. येथे यावेळी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहिर झाले आहे. पार्टे कोंड आणि सावंतकोंड येथील ग्रामस्थ एकत्र बसून शिवसेना पक्षपातळीवर दोन उमेदवारांना अडीच अडीच वर्षे विभागून उमेदवारी देण्याच्या हेतूने माजी नगराध्यक्षा सुनीता पार्टे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ही जागा बिनविरोध राहिल, असे समजून हा निर्णय घेण्यात आला तरी पोलादपूर शहरातील कोणताही मतदार कोणत्याही योग्य प्रभागातून उमेदवारी करू शकत असल्याने काँग्रेसच्या मीनल जगताप यांनी अर्ज दाखल केला आहे.
प्रभाग 1 मध्ये 229 पुरूष आणि 142 महिला असे सर्वाधिक 471 मतदार आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 96 तर शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा सुनीता पार्टे यांना 129 मते मिळाली होती. यावेळी पार्टेकोंड व सावंतकोंड शिवसेनेच्या पाठिशी ठाम असल्याने याठिकाणी या प्रभागातून दुसरा उमेदवारी अर्ज दाखल न झाल्यामुळे शिवसेनेच्या विजयाचा श्रीगणेशा टाळण्यासाठी काँग्रेसने अन्य प्रभागातील महिला सर्वसाधारण उमेदवारास येथून अर्ज दाखल केला असला तरी काँग्रेसचे मागीलवेळीचे मतदान यावेळी घटण्याची चिन्हे आहेत.
प्रभाग 3 मध्ये तिरंगी तुल्यबळ टक्कर
पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रभाग 3 मध्ये काँग्रेस पक्षाने निखिल कापडेकर या तरूणाला उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पक्षाने त्यांच्याच नात्यातील विशाखा निलेश आंबेतकर यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, शिवसेनेने यात रोहित सावंत यांना उमेदवारी दिल्याने अनुसुचित जाती प्रवर्गातील तिरंगी टक्कर तुल्यबळ झाली आहे.

मात्र, यापुर्वी या प्रभागातून काँग्रेसला 83 मते चांगल्याप्रकारे साथ दिली गेली असून शिवसेनेला 56 तर भाजपाला 38 अशाप्रकारे काँग्रेसविरोधी मतांचे विभाजन होऊन काँग्रेसला संधी मिळाली होती. याचप्रकारे यावेळी मतदारांचा कौल राहिल्यास काँग्रेसला ही लढत जिंकता येईल अशी परिस्थिती राहिल. प्रभाग क्र. 3 मध्ये रोहिदासनगर, भैरवनाथनगर उत्तरेकडील भाग व महिला सभागृह उत्तरेकडील भाग या लोकवस्तीत 102 पुरूष आणि 125 महिला असे 227 मतदार आहेत.
प्रभाग 4 मध्ये चौरंगी लढतीत मतविभाजनाचा खेळ
प्रभाग क्र. 4 मध्ये भैरवनाथनगर उत्तरेकडील भाग, बाजारपेठ उत्तरेकडील भाग, गणपतीमंदिर ते जयंत विठ्ठल शेठ यांच्या घरापर्यंत व आनंदनगर रस्त्याच्या उत्तर पूर्वेकडील भाग अशी लोकवस्ती असून येथून शिवसेनेचे प्रसन्ना बुटाला तिरंगी लढतीत निवडून आले होते. सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित जागेमुळे या प्रभागातून मतदारांना प्रभावी महिला निवडून आणावी लागणार आहे. प्रसन्ना बुटाला यांना पाच वर्षात एकदाही उपनगराध्यक्षपद अथवा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली नव्हती.

काँग्रेस पक्षाने येथे प्रतिक्षा प्रमोद शिंदे यांना संधी दिली आहे तर भाजपाने शिला बुटाला यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेनेने शिल्पा दरेकर यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी प्रथमच प्रांजली भुवड या सुशिक्षित दिव्यांग मुलीची उमेदवारी लक्ष्यवेधक ठरणार आहे. चौरंगी लढतीत मतविभाजनाचा खेळ महत्वपूर्ण ठरणार असून काँग्रेसची गेल्यावेळेची मते अत्यल्प असताना यावेळी या प्रभागातील भैरवनाथनगर मोठया मतदार संख्येची लोकवस्ती असल्याने शिवसेनेसोबत मतविभागणी होऊन उर्वरित भागात अपक्ष आणि भाजपाकडून मतांची बेगमी झाल्यास लढत काँग्रेस व शिवसेनेमध्येच निर्णायक ठरणार आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला 66, भाजपला 98 तर शिवसेनेचे प्रसन्ना बुटाला यांना सर्वाधिक 209 मते मिळून ते विजयी झाले होते. मात्र, यावेळी या प्रभाग 4 मध्ये 191 पुरूष आणि 261 महिला असे 471 मतदारांच्या विविध लोकवस्त्यांकडून आपआपल्या जवळच्या उमेदवारांना मतदान झाल्यास प्रभागाचा कौल बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत.








Be First to Comment