Press "Enter" to skip to content

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची घेतली भेट

माथेरान मधील भाडेपट्टा मिळकती कब्जा हक्काने मंजूर कराव्यात ! काँग्रेस नगरसेवक शिवाजी शिंदेंची मागणी

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |

माथेरान नगरपरिषद हद्दीतील ब्रिटिश कालीन भाडेपट्टा मिळकती विधिवत ताबा असलेल्या जमीन धारकास बाजार मूल्यांकनाच्या आधारावर कब्जा हक्काने मंजूर कराव्यात अशी मागणी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदेंनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मुंबई येथील दालनात समक्ष भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले आहे.यावेळी त्यांच्या सोबत माथेरान शहर काँग्रेस अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सर ह्युज मॅलेट यांनी १८५० मध्ये माथेरानचा शोध लावला होता तदनंतर १९०५ सालापासून इथे नागरी वसाहती करीता गरजेनुसार निवासी व वाणिज्य कारणास्तव भाडेपट्ट्याचे भूखंड वितरीत करण्यात आले होते. तेव्हापासून ते आजमितीपर्यंत माथेरान नगरपरिषद हद्दीत सुमारे ४४२ इतक्या निवासी व वाणिज्य स्वरूपाच्या कारणांसाठी खाजगी मालमत्ता आहेत. तत्कालीन प्रसंगी संदरच्या जमीनी नाममात्र पैशांमध्ये भाडे आकारून ९९ वर्षांच्या करारावर भुई भाड्याने देण्यात आलेल्या आहेत. या सर्व मिळकती भाडेपट्ट्याने असल्याने संबंधीत धारकांना बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नाही.

यामुळे सदर भूखंडावरील मिळकती देखरेखीअभावी जीर्ण होऊन त्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापूर्वी शासन निर्णयाने मौजे नेरळ व कर्जत येथील भाडेपट्ट्याच्या मिळकती प्रचलित बाजार
मूल्यांकनाच्या २५% इतकी रक्कम आकारून जमीन धारकास कायमस्वरूपी कब्जा हक्काने देण्यात आलेल्या आहेत.

त्याच धर्तीवर अधिनियमातील तरतुदींनुसार माथेरान नगरपरिषद हद्दीतील संबधीत भाडेपट्टा मिळकतीवर बाजार मूल्यांकनाच्या आधारे अल्प रक्कम जमीन धारकास कायमस्वरूपी कब्जा हक्काने मंजूर करण्यात याव्यात जेणेकरून स्थानिक नागरिकांना सदर जमिनीचे मालकी हक्क प्राप्त होऊन शासनाच्या तिजोरीत करोडो रुपयांचा महसूल जमा होऊ शकेल असे नगरसेवक शिवाजी शिंदेंनी निवेदनात नमूद केले असून याबाबतच्या प्रति मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त कोकण विभाग कोकण भवन, जिल्हाधिकारी रायगड, उप विभागीय अधिकारी कर्जत, अधिक्षक कार्यालय माथेरान,मुख्याधिकारी माथेरान नगरपरिषद यांच्याकडे माहितीसाठी सादर केल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.