माथेरान मध्ये पर्यटक महिलेची गळा चिरून हत्या ! आरोपी फरार
सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे |
माथेरान मधील इंदिरा नगर परिसरामध्ये एका महिला पर्यटकांची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून विशेष म्हणजे ह्या महिलेचे मुंडके हत्या करणार्याने कापून नेले असल्याने परिसरामध्ये दहशतीचे वातावरण आहे.
माथेरान मधील इंदिरा नगर परिसरामध्ये अनेक लॉजिंग व्यवसाय करीत असतात अशाच एका ठिकाणी ही घटना घडली असून काल ह्या ठिकाणी एक जोडपे राहण्यासाठी आले होते. नेहमी प्रमाणे लॉजिंग मालकाने त्यांची नावे रजिस्टर मध्ये लिहून त्यांना खोली भाड्याने दिली होती व सकाळी जेव्हा ह्या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड कॉट खाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले व त्याचे शीर गायब होते.
सदर महिलेस अतिशय निर्घृण पणे मारण्यात आले असून खुन्याने कोणताही पुरावा मागे राहणार नाही ह्याची पुरेपर खबरदारी घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे असून धडापासून शीर वेगळे करून सदर धड निर्वस्त्र अवस्थेत खुनी तिथेच सोडून गेला आहे. तर महिलेचे शीर व कपडे सोबत घेऊन जाताना सदर खोलीतील रक्त ही पुसले असल्याचे दिसून येत होते ही घटना समोर आल्यानंतर दोघांचेही ओळखपत्र तपासले असता रूम घेताना दिलेली माहिती खोटी असल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे. दोघांचीही नावे व पत्ता खोटा असल्याचा संशय घेण्यात येत आहे.
मागील काही दिवसांमध्ये माथेरान मध्ये अल्पवयीन मुलांचा वावर वाढला असून आशा लोकांना सावज करून माथेरान बाहेरील अनेक जण दलाली करून त्यांना खोल्या उपलब्ध करून देत आहेत. तर नेरळ येथे ही अल्पवयीन व पर्यटकांना खोटी माहिती पुरवून माथेरानमध्ये तिथूनच रूम्स विकण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा लोकांमुळे माथेरान मध्ये अनधिकृत लॉजिंग व्यवसायाचे पेव वाढत चालले असून काहीजण तर ओळ्खपत्राची छाननी ही बरोबर करीत नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अशा माथेरान विरोधी लोकांना रोखल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत असे स्थानिकांचे म्हणणे आहे.








Be First to Comment