सिटी बेल लाइव्ह / धाटाव(शशिकांत मोरे)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत दरवर्षीप्रमाणे यंदाही जेएम राठी स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के लागला. १०० टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवत राठी स्कुलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
दहावीच्या परीक्षेला १३४ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १०८ विद्यार्थी विशेष श्रेणीत (डिस्टिंक्शन), २४ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. श्रेया आठवले (९६%) हिने प्रथम, ऋतुजा मोकल (९५.८०%) हिने द्वितीय, समीक्षा पाटील (९५.४०%) हिने तृतीय, हिरल जैन (९५%), मधुरा वालेकर (९४.६०%) यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला. बारावीचा निकालही १०० टक्के लागला. ३६ पैकी सहा विद्यार्थ्यांना विशेष श्रेणी, १६ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी, तर १४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी मिळाली. समिधा पाटील (८०.७७%) हिने प्रथम, कैरवी शाह (७९.३८%) हिने द्वितीय, प्राणिल राऊत (७८%) याने तृतीय, म्युरिअल रॉड्रिग्ज (७७.६९%), मृदुला देशमुख (७६.३१%) यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य लीना डेव्हिड यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे घेतलेल्या मेहनतीमुळे हे घवघवीत यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. लीना डेव्हिड म्हणाल्या, “राठी स्कुलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. शाळा, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि मूल्यांकन अशा पाच गोष्टींवर लक्ष केंद्रित करून आमची वाटचाल सुरु आहे.”
“यावर्षी कोरोनाची परिस्थिती आम्हा सगळ्यांसाठीच नवीन होती. मात्र, या पार्श्वभूमीवर आम्ही अनेक बदल स्वीकारत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप, गरजूना शिक्षकाच्या वतीने अन्नधान्य किट, शाळेतील निर्जंतुकीकरण आणि इतर गोष्टी केल्या आहेत. व्हर्च्युअल शिक्षणासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, वेबिनार्स घेण्यात आली. पालकांच्याही बैठका ऑनलाईन घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी छोट्या छोट्या व्हाट्सअप ग्रुपची निर्मिती करून लॉकडाऊन काळात त्यांना शिक्षण दिले जात आहे. वेगवेगळे उपक्रम, कार्यशाळा, करिअर मार्गदर्शन आदी गोष्टी या काळात होत आहेत,” असेही लीना डेव्हिड यांनी सांगितले.






Be First to Comment