कर्जत भूमिअभिलेख कार्यालयाचे छाननी लिपिक दत्ता जाधव 10 हजाराची लाच घेताना अटक
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुका भूमिअभिलेख कार्यालयात जमिनीची मोजणी केल्यानंतरच हद्द कायम करणारा मोजणी नकाशा देण्यात टाळाटाळ केली जात होती. त्या कामासाठी या कार्यालयातील छाननी लिपिक दत्ता जाधव हे 10 हजार रूपयांची मागणी करीत होते. सततच्या त्रासाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने अलिबाग येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर रचलेल्या सापळ्यात छाननी लिपिकाला 10 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.
कर्जत तालुक्यातील आरवंद येथील कैलाश पेरणेकर यांनी आपली सात गुंठे जमीन कर्जत भूमिअभिलेख कार्यालयाकडे मोजणी करून घेतली होती. 25 ऑक्टोबर रोजी आरवंद येथील जमिनीची मोजणी झाल्यानंतर त्या मोजणीचा नकाशा तसेच हद्द निश्चित करणारे प्रमाणपत्र देण्याचे काम या कार्यालयाचे असते. त्यासाठी छाननी लिपिक दत्ता जाधव हे दहा हजार रुपयांची मागणी करीत होते. कार्यालयात गेल्यानंतर पेरणेकर यांच्याकडून पैसे पोहचले नाहीत तर पुढचे काम होणार नाही असे दत्ता जाधव यांनी सांगितले.

शेतकरी पेरणेकर यांनी अलिबाग येथे जाऊन लाचलुचपत विभागाच्या उपअधीक्षक सुषमा सोनवणे यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली. त्यानंतर दुपारी कर्जत भूमिअभिलेख कार्यालयात अलिबाग लाचलुचपत विभागाने सापळा लावला.त्या कार्यालयात जाधव यांना शेतकरी कैलाश पेरणेकर यांच्याकडून 10 हजार रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. कर्जत तालुक्यात अनेक महिन्यांनी लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली असून या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
लाचलुचपत प्रतिबंध विभाग अलिबाग रायगड येथील पोलीस उप अधीक्षक सुषमा सोनावणे, पोलीस निरीक्षक रणजित गलडि, पोलीस हवालदार महेश पाटील, कौस्तुभ मगर, पोलीस नाईक जितेंद्र पाटील यांनी ही कामगिरी केली आहे. तसेच लाच देणे आणि घेणे दोन्हीही गुन्हा असून भ्रष्टाचार संबंधी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








Be First to Comment