Press "Enter" to skip to content

अजीत पवारांनी घेतली पनवेल महानगरपालीकेची झाडाझडती

पनवेलच्या सर्वांगिण विकासासाठी राजकीय इच्छा शक्ती असणे महत्वाचे : उपमुख्यमंत्री अजित पवार

सिटी बेल | पनवेल | संजय कदम |

पनवेलचा विकास चोहोबाजूने होत असल्याने अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिका त्या दृष्टीने ठोस पाऊले उचलत असली तरी सर्व राजकीय पक्षांची इच्छाशक्ती या विकासाला महत्वाची आहे. तरी राजकारण निवडणुकीपुरतेच करू इतर वेळी पनवेलचा विकास कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे आवाहन आज पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री आदिती तटकरे, खा.सुनील तटकरे, आमदार बाळाराम पाटील, आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, सिडकोचे अधिकारी संजय मुखर्जी, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, काॅंग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, काँग्रेस महानगरपालिका जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत, नगरसेवक सतीश पाटील, नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, महिला आघाडीच्या भावना घाणेकर, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, सुनील मोहोड, राष्ट्रवादीचे नेते ताहिर पटेल आदींसह विविध विभागातील शासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिके संदर्भातील विविध विकास कामांचा लेखाजोगा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडला. त्याचप्रमाणे महानगरपालिका उभारत असलेली 110 कोटीची भव्य इमारत, विविध महानगरपालिका वॉर्ड कार्यालये, विविध शासकीय योजना त्याचप्रमाणे कोव्हीड काळात उभारण्यात आलेले जम्बो कोव्हीड सेंटर, रस्ते, पाणी, नागरी सोयी-सुविधा याबाबतची माहिती त्यांनी दिली. अनेक गोष्टी सिडकोकडे असल्याने व कित्येक प्लॉट हे अद्यापपर्यंत हस्तांतरीत न झाल्याने विकासकामे रेंगाळल्याचेही यावेळी दिसून आले. या सर्व गोष्टींची दखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेवून आगामी काळात सिडको व पनवेल महानगरपालिकेने एकत्रितपणे येवून पनवेलकरांना जास्तीत जास्त चांगल्या सोयीसुविधा द्याव्यात या संदर्भात आवश्यक त्या सूचना भर बैठकीमध्ये मोबाईलद्वारे संबंधित अधिकारी वर्गांना त्यांनी दिल्या. शासन पूर्णपणे पनवेल महानगरपालिकेच्या पाठीशी उभे आहे. कोणत्याही प्रकारे विकासकामे रेंगाळली नाही पाहिजेत, असे अजित पवार यांनी सांगून या मुलभूत सुविधांबरोबर अत्याधुनिक स्टेडियम, 400 मीटर रनिंग ट्रॅक, वाहतूक कोंडी सोडविण्यासंदर्भात उपाय योजना, झोपडपट्टी विभागासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना राबविणे, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गरीबांना फायदा करून देणे या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच पनवेलकरांना भेडसाविणार्‍या दुहेरी करासंदर्भात सुद्धा हा धोरणात्मक निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे सुतोवाच त्यांनी केले.

तसेच प्रामुख्याने नैना प्रश्‍नासंदर्भात त्यांनी आढावा घेवून सिडकोला त्याबाबत योग्य उपाययोजना करण्याचे सांगितले. अन्यथा या भागातील लोकांच्या नैना रद्द करण्याच्या मागणीच्या रेट्यापुढे शासनाला योग्य निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही सिडकोच्या उपस्थित अधिकार्‍यांना दिला. ग्रामीण भागातील पाणी प्रश्‍नासंदर्भात पाणी पुरवठा विभागाला आवश्यक त्या सूचना त्यांनी केल्या. तसेच देहरंग धरणाची पातळी वाढविणे व पनवेल शहर व ग्रामीण भागासाठी इतर ठिकाणावरुन पाणी पुरवठा करण्यासंदर्भात सुद्धा उपस्थित अधिकार्‍यांशी चर्चा त्यांनी यावेळी केली. तसेच संबंधित सर्व प्रश्‍न निकाली काढण्यासंदर्भात त्या-त्या खात्याने लवकरात लवकर या संदर्भात माहिती शासनाला द्यावी, असेही त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे पनवेल-जेएनपीटी रोड, कळंबोली स्टील मार्केट व अनेक ग्रामीण भागात विना परवाना पार्कींग झोन तयार करण्यात आले आहेत. सदर पार्कींग झोनवर तातडीने कारवाई करावी व वाहतूक कोंडीचा प्रश्‍न त्वरित सोडवावा, अशा सुचना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांना भर बैठकीत दिल्या. यावेळी पनवेल परिसरातील विविध सामाजिक संस्था, संघटना आदींनी आपल्या परिसरातील नागरी प्रश्‍ना संदर्भात निवेदने सादर केली. त्याचे तातडीने निराकरण केल्याने महाविकास आघाडीच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले आहे.

अजीत पवार स्पेशल दम…
आयुक्तांनी कार्यालयात न बसता पनवेल परिसरातील वेगवेगळ्या प्रभागात रोज सकाळी भेट देवून तेथील अडीअडचणी समजून घ्याव्यात व नागरिकांना सोयी सुविधा मिळतात की नाही हे पहावे.
नागरी प्रश्‍नाबाबत सिडको व पनवेल महानगरपालिका यांच्यात कट्टीबट्टी आहे का ? हे मला समजत नाही हे या दोघांनी एकत्रित येवून प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे.

जे अधिकारी आजच्या बैठकीला सांगून सुद्धा उपस्थित राहिले नाहीत त्यांची येत्या सोेमवारी अधिक माहिती घेतली जाईल.

पोलिसांनी चिरीमिरी घेणे सोडून द्यावे, वाहतूक कोंडीचा प्रश्‍न पहिला सोडवावा, हेल्मेट वर कारवाई करणे आता तरी थांबवा.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.