उरणकरांचे रोजचं मरण ! रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता ? काही समजेना !
सिटी बेल लाइव्ह / जेएनपीटी ( अनंत नारंगीकर )
उरण शहराच्या प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देण्यास उरण येथील सिडको विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळच मिळत नसल्याने रात्री अपरात्री ये-जा करणा-या वाहन चालकांना,नागरीकांना नाहक त्रास सहन करत रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्गक्रमण करावा लागत आहे.त्यामूळे सार्वजनिक बांधकाम विभागाने उरणकरांना लोटलं खड्ड्यात अशी म्हणण्याची वेळ आम जनतेवर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथील कार्यालयाच्या माध्यमातून मागील वर्षी बोकडविरा चार फाटा ते उरण शहर प्रवेशद्वार ( कोट नाका ) या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करोडो रुपये खर्च करून करण्यात आले.परंतू पावसाळ्यात उरण शहर प्रवेशद्वार ( कोट नाका ) या ठिकाणी रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडल्याने उरण शहरात ये - जा करणाऱ्या वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे.तसेच सदर रस्त्यावरील खड्ड्यांमूळे वाहतूक कोंडीची समस्यां उदभवत आहे.परंतु जून जुलै महिना संपत आल्या नंतर ही सिडकोने आपल्या ताब्यात घेतलेल्या सदर रस्त्यावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले नाही.यामुळे जनतेत,प्रवाशी वर्गात सध्या सिडको विभागाच्या ढिसाळ कारभाराबद्दल नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. नितीन भोये कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग उरण - पनवेल यांनी सांगितले की बोकडविरा चार फाटा ते उरण शहर प्रवेशद्वार (कोट नाका) हा रस्ता दोन महिन्यांपासून सिडको कडे वर्ग करण्यात आलेला आहे.त्यामूळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी सिडकोने करणे गरजेचे आहे.सिडको द्रोणागिरी नोड कार्यालयाकडे विचारणा केली असता.त्या रस्त्याला सध्या अधिकारी वर्ग वाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.






Be First to Comment