पोलादपूर महाड दरम्यान महामार्गावरील प्रवास खड्डयांमुळे मंद आणि कॉक्रीटीकरणामुळे जलद : वाया गेलेला वेळ भरून काढण्याचा प्रयत्न ठरतोय धोकादायक
सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 च्या चौपदरीकरणादरम्यान पोलादपूर ते महाडदरम्यानचा प्रवास हा खड्डयांमुळे कंटाळवाणा तर काँक्रीटीकरणाचा रस्ता सुरू झाल्यावर वाय गेलेला वेळ भरून काढण्याच्या प्रयत्नात जलद गतीने होत आहे. मात्र, हाच वाया गेलेला वेळ भरून काढण्याचा प्रयत्न जीवावर बेतणारा ठरत असल्याचे बुधवारी सकाळी तरूणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते यंदाच्या पावसाळयात जीर्णावस्थेत पोहोचले असताना तेथून मोटारसायकल व अन्य वाहनांतून महामार्गावर येऊन प्रवास करणाऱ्यांकडून वाहनाची गती वाढवून खड्डयांमुळें वाया गेलेला वेळ भरून काढण्याच्या प्रयत्नांत होणारे अपघात जीवघेणे ठरत आहेत.
बुधवारी उमरठ येथील सर्वेश विश्वनाथ कळंबे हा 20 वर्षीय तरूण लोहारमाळ येथील सोबती सिध्देश राजेंद्र नरे या 17 वर्षीय तरूणासोबत मोटारसायकलवरून महाडकडे आयटीआय प्रशिक्षण केंद्रामध्ये जात असताना इसाने कांबळे गावाच्या हद्दीमध्ये पुढे असलेल्या राहुल अशोक उतेकर या तुर्भे ता.पोलादपूर येथील तरूणाच्या मोटारसायकलच्या हॅण्डलला सर्वेश कळंबे याची मोटारसायकल धडकून वेगाने पुढे असलेल्या इनोव्हा कारच्या मागील भागावर आदळली. या अपघातामध्ये राहुल उतेकर याच्या मोटारसायकलवरील पोलादपूर तालुक्यातील तुर्भे गावठाण येथील अविनाश गोळे यांच्यासह राहुल उतेकर आणि सर्वेश कळंबे याच्या मोटारसायकलवरील लोहारमाळ येथील सिध्देश नरे आणि स्वत: सर्वेश असे चौघेजणही जखमी झाले. यामध्ये सर्वात जास्त जखमी अवस्था सर्वेश याची असल्याचे अपघातस्थळी दिसून आले.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर नियमित सेवाभावी वृत्तीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या मिनीडोर चालक मालक संघटनेचे अध्यक्ष पार्टे यांनी मिनीडोरमधून या चारही जखमींना तातडीने महाड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी नेले. यावेळी कोणतीही सरकारी अथवा राजकीय पक्षाची रूग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही. उपचारादरम्यान गंभीर जखमा व दुखापती झालेल्या सर्वेश कळंबे याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे खड्डयांमुळे वाया गेलेला वेळ भरून काढण्याच्या प्रयत्नांत झालेल्या अपघातामध्ये हकनाक बळी गेल्याचे उघड झाले आहे.
पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयामध्ये तातडीने उपचार होईल अशा सुविधा तसेच वैद्यकीय अधिष्ठाता नसल्याचे दिसून येत असताना महाड येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये देखील सर्वेश याच्या मृत्यूनंतर उपचारात हेळसांड झाल्याची नाराजी स्पष्ट झाल्याने पोलादपूर ते महाडदरम्यानच्या प्रवासामध्ये अपघात झाल्यानंतर दोन्ही शहरातील आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरत असल्याची भावना संतप्त नातेवाईकांकडून उफाळून आली.
यामुळे जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या महामार्गावरील खड्डयांप्रमाणेच गुळगुळीत काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावरून संयमाने वाहने चालविण्याची गरज निर्माण झाली असून शासनाने याचदरम्यान महामार्गापासून जवळच असलेल्या पोलादपूर आणि महाड येथील ग्रामीण रूग्णालयांमध्ये अपघातांतील जखमींवर उपचार करण्याइतपत सुसज्जता आणण्याची गरज आहे.








Be First to Comment