Press "Enter" to skip to content

सिमेंटच्या जंगलात जेव्हा येतो खऱ्या जंगलातला प्राणी

खारघरमधील खाडी किनार्‍यावर घडले कोल्हाचे दर्शन

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबईला विस्तीर्ण असा खाडीकिनारा लाभला आहे. या खाडीकिनारी असंख्य जीव आहेत. या खाडीलगत असलेल्या खारफुटीच्या जंगलात अगदी पूर्वीपासून कोल्हे राहत आहेत. दोन दिवसांपूर्वी खारघर से. 17 येथील खाडीकिनारी कोल्हा दिसताच एका छायाचित्रकाराने कोल्हाचे फोटो कॅमेर्‍यात कैद केले आहे.

खारघरमधील खाडी किनार्‍यावर कोल्हाचे दर्शन झाल्यामुळे नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहे. खारघरमधील सेंट्रल पार्कलगत असलेल्या ओवेपेठ, रांजणपाडा, मुर्बी गाव आणि सेक्टर 17, 16मधील वास्तुविहार लगत असलेल्या खाडीकिनारा परिसर आहे. थंडीची चाहूल सुरू होताच खाडी किनार्‍यावर देशविदेशातील विविध प्रकारचे पक्षी खाद्याच्या शोधात येत आहे.

खाडीलगत असलेल्या खारफुटीच्या जंगलात पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी पक्षीतज्ज्ञ आणि तर पक्षीप्रेमी पक्ष्यांना पाहण्यासाठी खाडी किनार्‍यावर भेट देत असतात. गेल्या दोन वर्षांत कधीही कोल्हा आढळून आला नाही, मात्र पक्ष्यांचा फोटो काढण्यासाठी गेलेल्या ए. के. नूल या छायाचित्रकाराला खाडी किनारा कोल्हा दिसताच त्यांनी त्याचे फोटो कॅमेर्‍यात कैद केले. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी खारघरमध्ये कोल्हा असल्याचे समजल्याने आश्‍चर्य व्यक्त केले.

खाडीतील मासळी, किनार्‍यावर येणारे पक्षी आदी खाद्य मिळविण्यासाठी कोल्हा परिसरातील कांदळवनात राहत असावा, असे मुर्बी येथील ग्रामस्थ दत्ता दळवी यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.