ग्राहकांची फसवणुक करणाऱ्या मनोज धुमाळ या बिल्डरविरोधात गुन्हा दाखल
सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |
पनवेलच्या वाकडी भागात बालाजी घरकुल हा गृहप्रकल्प उभारणाऱ्या बांधकाम व्यावसायीकाने अनेक ग्राहकांना फ्लॅट अथवा त्यांची रक्कम परत न दिल्याने संबधित ग्राहकांनी या बांधकाम व्यावायीकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा मालक मनोज धुमाळ याच्या विरोधात फसवणुकीसह अपहार तसेच मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा मालक मनोज धुमाळ याने 2012 मध्ये पनवेलच्या वाकडी भागात बालाजी घरकुल हा गृहप्रकल्प उभारण्यात येत असल्याची जाहिरातबाजी केली होती. त्यावेळी अनेक लोकांनी या गृहप्रकल्पातील फ्लॅटची बुकिंग केली होती. त्यावेळी बांधकाम व्यावसायिक मनोज धुमाळ याने 2 वर्षांमध्ये फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन बुकींग धारकांना दिले होते. तसेच फ्लॅटची बुकिंग करणाऱ्या बहुतेक ग्राहकांकडून त्याने 4 ते 5 लाख रुपयांची रक्कम उकळली होती.
बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीने दोन वर्षानंतर देखील नियोजित जागेवर इमारतीचे बांधकाम केले नाही.
त्यामुळे फ्लॅट ची बुकिंग करणाऱ्या ग्राहकांनी फ्लॅटचा ताबा कधी मिळेल याबाबत बांधकाम व्यवसायिकाकडे विचारणा सुरु केल्यानंतर बांधकाम व्यावसायीक मनोज धुमाळ याने सुरुवातीला वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारुन नेली. त्यामुळे फ्लॅटसाठी रक्कम गुंतविणार्या ग्राहकांनी आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्यानंतर मनोज धुमाळ याने त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली.
त्यामुळे बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सकडे फ्लॅटची बुकींग करणाऱ्या काही व्यक्तींनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बालाजी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या कंपनीचा मालक मनोज धुमाळ याच्या विरोधात फसवणूकिसह अपहार आणि महाराष्ट्र ऑनरशिप ऑफ फ्लॅट्स ऍक्ट, तसेच रियल इस्टेट अधिनियमानुसार गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.








Be First to Comment