एन.आर. सी / सी. ए. ए विरोधातील लढ्यात सहभागी आंदोलनकर्त्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्या !
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
एन. आर. सी / सी. ए. ए व एन.पी. आर विरोधातील लढ्यात सहभागी आंदोलनकर्त्यावरील गुन्हे तत्काळ मागे घ्या! अशा मागणीचे निवेदन भारत मुक्ती मोर्चा संलग्न असलेल्या राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने पाली सुधागड तहसील मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. लोकशाहीत सरकारच्या विविध धोरणांच्या विरोधात संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा मूलभूत अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. त्यानुसार एन.आर. सी / सी. ए.ए / व एन.पी.आर आदी धोरणाविरोधात संविधानिक मार्गाने संपूर्ण राज्य व देशभरात व्यापक स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले. लॉक डाऊन च्या काळात केंद्र सरकारच्या माध्यमातून या लढ्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर व विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जात आहे. सदर निवेदन पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी स्वीकारून पुढील कार्यवाहीसाठी पाठविणार असल्याचे आश्वासने केले. सदर निवेदनात म्हटले आहे की एन आर सी / सी ए ए व एन पी आर विरोधातील लढ्यात सहभागी झालेल्या डॉ.कफिल खान यांना खोट्या केसेसच्या आधारे जेरबंद केले आहे. डॉ.कफिल खान यांनी गोरखपूर येथील घटनेत आपल्या कणखर नेतृत्वाखाली जीवावर उदार होऊन 70 हुन अधिक मुलांचे प्राण वाचविले होते. परंतु त्यांच्यावर जाणीवपुर्वक सूड उगवला जात असल्याचा आरोप निवेदनकर्त्यांनी केला आहे. आंदोलनात सहभागी डॉ.कफिल खान व विद्यार्थ्यांना निर्दोष मुक्त करावे या मुद्यावर देशव्यापी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाद्वारे भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून 35 राज्यात,550 जिल्हे व 4000 तहसिल कार्यात एकाचवेळी राष्ट्रपती महोदय यांच्या नावे मागणीचे निवेदन दिले जात असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी अकबर पानसरे,सुरेश आंग्रे, वंदीप जाधव, भिम महाडिक यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थीत होते.






Be First to Comment