पाच्छापूर येथे बिबट्याचा वासरावर हल्ला…
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर येथे एका बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले आहे. ही घटना पहाटे 2:30 च्या सुमारास घडली. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की पाच्छापूर येथील सुरेश गोविंद वरघडे यांना पहाटे त्यांच्या गुरांच्या बेड्यात किंवा वाड्यात बिबट्या आला असल्याची चाहूल लागली. वरघडे यांनी ताबडतोब आरडाओरडा केला असता बिबट्या तेथून पळून गेला. मात्र वासरावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे. वरघडे यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाली-सुधागड वनविभागाकडे अर्ज केला आहे.
सुधागड तालुका हा दुर्गम जंगल दऱ्या खोऱ्या, डोंगराळ, माळरान व वनछदीत प्रदेशाने विस्तारला आहे.अशातच येथील जनगलभागात सातत्याने विविध प्रकारचे वन्यजीव, हिंस्त्र प्राणी असल्याचे वारंवार दिसून आले. तालुक्यातील अनेक गावे, आदिवासीं वाड्याना चहूबाजुनी दाट व विस्तृत जंगलाने वेढा दिला आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबटे लोकवस्तीच्या आसपास वावरताना दिसतात. बिबट्यांचा मुक्त संचाराने तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहेत. भविष्यातील मोठा धोका टाळण्यासाठी वनविभागाने वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.
याबाबत पाली सुधागड वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी सांगितले आहे की या घटनेचा वनविभाग व पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पंचनामा केला आहे. नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहोत. काही दिवसांपूर्वी खडसांबळे-नागाव परिसरात लोकांना बिबट्या दिसला होता कदाचित हा तोच बिबट्या असण्याची शक्यता आहे. असे शिंदे यांनी सांगितले. तसेच लोकांनी रात्री घराबाहेर पडू नये. काम नसतांना जंगलात जाऊ नका. रात्री दारे खिडक्या लावून झोपावे, गुरांचे वाडे देखील बंद करावे. याबरोबरच लहान मुलांना बाहेर एकटे सोडू नये असे आवाहन वनक्षेत्रपाल समीर शिंदे यांनी केले आहे. वनविभाग त्या ठिकाणी जाऊन जनजागृती देखील करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले.










Be First to Comment