वाढत्या मृत्यू दराने चिंता
कारखान्यातूंन विषारी धुरासोबत कोरोनाचा ही फैलावतोय संसर्ग
स्थानिकांत घबराट : कोरोनाकाळात लेकीबाळी असुरक्षित
लॉक डाऊन काळात रायगड पोलिसांची 12 लाखाची दंडात्मक वसुली
सिटी बेल लाइव्ह / रायगड(धम्मशिल सावंत)
मुंबई , पुणे ,ठाणे आदी जिल्ह्याच्या पाठोपाठ रायगड जिल्ह्याची आकडेवारी वेगाने वाढत असून कोरोनाने शहरी व ग्रामीण भागात आपले हातपाय पसरले आहेत. बघता बघता जिल्ह्यात 15 हजार रुग्णसंख्या पार केल्याची माहिती केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या https://www.covid19india.org/ या संकेतस्थळावरून स्पष्ट झाली आहे. याबरोबरच जिल्ह्यात आजवर 380 हुन अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतल्याने जिल्ह्याची चिंता अधिकच वाढली आहे. रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होत असली तरी मृत्युदर वाढत असल्याने रायगडवासीयांच्या मनात भीतीने घर केले आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा वेग वाढत असून एका दिवसात 333 नव्या करोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक बडे कारखाने,प्रकल्प व उद्योगधंदे येथील कामगारांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या वास्तववादी तक्रारी व चित्र स्पष्ट झाल्याने कंपनी परिसरातील ग्रामस्त भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसते. त्यामुळे येथील कामगारांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
रायगड जिल्ह्यासाठी या भयावह वातावरणातही दिलासादायक बाब म्हणजे स्वतःच्या प्रतिकार शक्ती व आत्मविश्वासाच्या जोरावर रायगड जिल्ह्यातील तब्बल 10 हजार 236 रुग्णांनी करोनावर यशस्वी रित्या मात केली आहे. आजघडीला जिल्हयात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 459 झाली असून यामध्ये पनवेल मनपा-1454, पनवेल ग्रामीण-400, उरण-163, खालापूर-314, कर्जत-102, पेण-264, अलिबाग-234, मुरुड-47, माणगाव-87, तळा-1, रोहा-143, सुधागड-12, श्रीवर्धन-27, म्हसळा-70, महाड-126, पोलादपूर-15 असा आहे.
एका दिवसात 333 नव्या रुग्णांची भर
जिल्हयात दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत 333 ने भर पडली असून यामध्ये पनवेल मनपा-201, पनवेल (ग्रा)-40, उरण-5, खालापूर-26, कर्जत-11, पेण-20, अलिबाग-8, रोहा-18, सुधागड-1, म्हसळा-1, महाड-2 असा आहे.
10 हजार 236 रुग्णांनी कोरोनाचे जिंकले युद्ध
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-4 हजार 618, पनवेल ग्रामीण-1 हजार 522, उरण-621, खालापूर-548, कर्जत-336, पेण-762, अलिबाग-685, मुरुड-85, माणगाव-193, तळा-21, रोहा-358, सुधागड-14, श्रीवर्धन-100, म्हसळा-109, महाड-214, पोलादपूर-50 अशी एकूण 10 हजार 236 आहे.
एका दिवसात 384 रुग्णांनी कोरोनाला हरविले
दिवसभरात पनवेल मनपा-173, पनवेल ग्रामीण-27, उरण-11, खालापूर-35, कर्जत-13, पेण-32, अलिबाग-38, माणगाव-6, रोहा-14, सुधागड-4, श्रीवर्धन-3, महाड-25, पोलादपूर-3 असे एकूण 384 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन सुखरूप घरी परतले.
कोरोनाने 380 नागरिकांचा घेतला बळी
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 380 नागरिकांचा बळी घेतला असून यामध्ये पनवेल मनपा-152, पनवेल ग्रामीण-44, उरण-26, खालापूर-28, कर्जत-16, पेण-22, अलिबाग-26, मुरुड-10, माणगाव-3, तळा-2, रोहा-12, सुधागाड-1, श्रीवर्धन-4, म्हसळा-7, महाड-21, पोलादपूर-6 असा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातून 45 हजार 386 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 397 आहे.
महाड,रोहा, कर्जत, पेण कोरोनाचे हॉटस्पॉट
रोहे शहर व ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असून आजवर येथे 513 रुग्ण आढळले असून तालुक्यात 12 जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यात देखील दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णात भर पडत असून येथील आजवरची रुग्णांची संख्या 361 वर पोहचली असून यापैकी 218 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाड तालुक्यात कोरोनाने तब्बल 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.पेण तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कर्जत तालुक्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून ही संख्या 454 झाली असून आत्तापर्यंत मृतांची संख्या 16 वर पोहचल्याने कर्जतकरांची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा वृद्धांसह तरुणांना ही धोका
कोरोनाने केवळ वृद्धच दगावतात ही बाब आता मागे पडली असून रायगड जिल्ह्यात कोरोनाने सामाजिक प्रवाहातील तरुण तडफदार नेते ,कार्यकर्ते, निमव्ययस्क नागरिकांचा मृत्यू झाल्याने कोरोनाचे भय जिल्हयात अधिकच गडद झाल्याचे दिसते. कोरोनाचे भय संपता संपेना अशी परिस्थिती जिल्ह्यात दिसून येत आहे.
अलिबाग व सुधागडला दिलासा
रायगड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी चिंताग्रस्त असलेल्या अलिबाग व सुधागड तालुक्याला आता दिलासा मिळाला आहे. अलिबाग तालुक्यात आठ नवे रुग्ण तर सुधागडात एक नवा रुग्ण आढळून आल्याने आजवर दैनंदिन येणारे रुग्णांचे धक्कादायक आकडे नियंत्रणात आल्याने अलिबाग व सुधागड तालुक्याला दिलासा मिळाला आहे.
आलॉकडाऊन काळात रायगड पोलिसांची 12 लाखाची कारवाई
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसाचा लॉक डाऊन जाहीर करण्यात आला होता. यादरम्यान जिल्हा पोलिस प्रशासनाने कठोर कारवाईची भूमिका स्वीकारत लॉकडाऊन व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना चाप लावत दंडात्मक कारवाई केली. रायगड पोलिसांनी या काळात तब्बल 12 लाख 11 हजार 300 रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केली आहे.
कोरोनाकाळात लेकीबाळी असुरक्षित
रायगड जिल्ह्यतील पनवेल येथील इंडिया बुल्स येथील विलगी करणं कक्ष येथील महिलेवर बलात्कार यापाठोपाठ सुदर्शन कंपनी आवारातील विलगी करणं कक्षात तरुणीची छेडछाड तसेच
रोहामध्ये घडलेली अल्पवयीन मुलीवर बलात्कार व खून ही घटना अतिशय हृदय हेलावणारी आहे. माणुसकीला काळीमा फासणारे असे कृत्य नराधमांनी केले आहे. एका निष्पाप मुलीवर नराधमांनी बलात्कार करुन तिची क्रूरपणे हत्या केली. राज्यामध्ये महिलांविरुध्द अशा भयंकर घटना रोज घडत असताना सरकार नावाची यंत्रणा गप्प बसली आहे. सरकारकडून कुठलेही भाष्य होत नाही. जनतेला आत्मविश्वास व धीर देण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील मुली, महिला या घरापासून लांब शाळेत, शेतावर व बाजार कामासाठी बाहेर जात असतात. पण आता या गंभीर परिस्थितीत वाडया वस्त्यांवरील आपल्या मुलींना तरुणींना, महिलांना घरातून बाहेर पाठावयाचे का…?असा सवाल उपस्थित होताना दिसतोय.
कोरोनातही माणुसकीचे दर्शन
कोरोनामुळे माणसांच्या स्वभावात कमालीचा बदल झाल्याचे दिसत असले तरी आजही अनेक ठिकाणी माणुसकी दर्शन घडते आहे. कोरोना संकटात सापडलेल्या अनेक कुटुंबाची वाताहत झाल्याचे दिसते. अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील एका कुटूंबावर ओढवली होती…, परंतु ग्रामस्थांनी सामाजिक भान राखून एकत्रित येत त्यांची भातलावणी पूर्ण करून दिली. कोरोना काळात रुग्ण व त्याच्या कुटुंबीयांनी बहिष्कृतासारखी वागणूक दिली जात असताना बेलोशी ग्रामस्थांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. पतीचे निधन, पत्नी आणि मुलगाही कोरोनाबाधित झाल्याने कुटुंब कोणत्या मानसिकतेत जगत असेल याची कल्पना न केलेली बरी. एकीकडे पती गेल्याचे दुःख दुसरीकडे भातशेती कशी लावायची, भातशेती लावली नाही तर वर्षभर खाणार काय, जगणार कसे? अशी दुःखद व कठीण परिस्थिती असताना बेलोशी ग्रामस्थांनी एक सकारात्मक पाऊल टाकत ठाकरे कुटूंबाला कोरोना काळात आधार दिला. समाजापुढे या कार्याचा आदर्श कायम प्रेरक ठरावा असाच आहे.

नियम व अटींचे पालन करा, जिल्हाधिकारी यांचे आवाहन मागील रुग्णसंख्येच्या तुलनेत आजमितीस रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला सर्वोतोपरी व सातत्याने सहकार्य करावे. शासनाचे नियम व अटी शर्थीचे पालन करा, कामाशिवाय घराबाहेर पडू नका, स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या, घरातील लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांची अधिक काळजी घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी चौधरी यांनी केले.






Be First to Comment