गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी खबरदारी म्हणून स्वतः कॉरेंटाईन रहावे..!
सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे.(धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यासह राज्य देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाना गणेशोत्सवाचे वेध लागलेत, मात्र उत्सव हे सुरक्षितता बाळगून साजरे होणे काळाची गरज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी आपण आल्यापासून पुढे 14 दिवस किंवा त्या वेळच्या शासनाचे जे नियम असतील त्या प्रमाणे सध्या रहात असलेल्या कुटुंबा सोबत कॉरेंटाईन राहणे गरजेचे आहे. असे आवाहन सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर (बु) गावचे सरपंच उमेश यादव यांनी केले आहे. तसेच हा गणेशोत्सव व सण नियम व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून साजरा करावा व सरकारला सहाय्य करावे अशी विनंती उमेश यादव यांनी केली.
सरपंच उमेश यादव यांनी ग्रामपंचायत हद्दीतील सर्व ग्रामस्थांना निवेदन केले की येणाऱ्या गणपती सणासाठी सतत विचारणा होत आहे की किती दिवसाचा कॉरेंटाईन कालावधी असेल, आम्ही गावी येऊ शकतो की नाही? मात्र या संदर्भात अजून शासनाचे कोणतेही लेखी आदेश प्राप्त झाले नाहीत. मात्र वेगाने वाढत असलेला कोरोना चा प्रसार, यामुळे सरकारी यंत्रणेवर असलेला ताण, या सगळ्याचा विचार करून जबाबदार नागरिक म्हणून पुणे,मुंबई, ठाणे व इतर शहर आणि जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांनी जुन्या नियमा प्रमाणे ज्यांना शक्य आहे त्या व्यक्ती किंवा कुटुंबाने 14 दिवस अगोदर येऊन कॉरेंटाईन राहणे आपल्यासाठी व इतर लोकांच्या हिताचे आहे. कदाचित नवीन आदेश आले आणि हा 14 दिवसांचा काळ 7 दिवस किंवा त्यापेक्ष कमी झाला तर तसे चाकरमान्यांना कळविण्यात येईल.
कोरोनाच्या संकटात उपाययोजना व खबरदारी म्हणून सरकार जे नियम बनवत आहे ते कुणालाही मुद्दामून त्रास देण्याच्या हेतूने नक्कीच बनवत नाही. त्यामागे लोकांना या रोगापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. सरकारी यंत्रणा सांगण्याचा काम करते पण ते नियम पाळणे हे आपलं कर्तव्य आहे.
यावर्षीच्या गणपती मध्ये आपण पूजा, दर्शन, आरती, महिलांचे गौरी पूजन, जागरण, विसर्जन या सगळ्यासाठी एकत्र न येता प्रत्येकाने आपापल्या घरीच योग्य खबरदारी घेत नेमक्या लोकांसोबत केल्यास नियम आपोआप पाळले जातील. शिवाय गणपती घरी आणतांना आपण ज्या ठिकाणाहून गणपती आणतो त्याचेही नियोजन आठ दिवस अगोदर करून घेतलं तर फार बरं होईल. जेणेकरून दोन दिवस अगोदर गणेशमूर्ती खरेदीसाठी शहाराठीकाणी होणारी गर्दी टाळण्यास मदत होईल आणि यंत्रणेला सहकार्य होईल. आपण सगळे एकत्र येऊन हा गणेशोत्सव कोरोना पासून सुरक्षित आणि आनंददायी राहून साजरा करूया असे आवाहन सरपंच उमेश यादव यांनी केले आहे.






Be First to Comment