Press "Enter" to skip to content

भामटा बिल्डर फरार

फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवून ग्राहकांकडून लाखो रुपये उकळणार्‍या बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल  

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

पनवेल मधील विचुंबे भागात इमारतीचे बांधकाम करणार्‍या एका बांधकाम व्यावसायीकाने सदर इमारतीतील फ्लॅट विकत देण्याचे अमिष दाखवुन 9 ग्राहकांकडून सुमारे 74 लाखांची रक्कम उकळून त्यांना मागील पाच वर्षामध्ये फ्लॅट न देता त्यांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सुमीत सदास मोरे असे या बांधकाम व्यावसायीकाचे नाव असुन खांदेश्‍वर पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकिसह मोफा कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. विशेष म्हणजे या बांधकाम व्यावसायिकाने यातील अनेक फ्लॅट दोन-दोन ग्राहकांना विकल्याचे देखील आढळुन आले आहे.  

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुमीत सुदास मोरे हा मे.एम.एस. प्रियदर्शी इंटरप्रायजेसचा प्रोप्रायटर असून त्याने2012-13 मध्ये पनवेलच्या विचुंबे भागात इमारत बांधकामासाठी घेतले होते. त्यावेळी मोरे याने सदर इमारतीतीचे बांधकाम 2 वर्षात पुर्ण करुन फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्‍वासन ग्राहकांना दिले होते. त्याच्या अमिषाला भुलून अनेक ग्राहकांनी त्याच्या इमारत बांधकाम प्रकल्पातील फ्लॅटची बुकिंग केली होती. तसेच अनेक ग्राहकांनी लाखो रुपये दिले होते. मात्र त्यानंतर मोरे यांने त्यानंतर इमारतीचे बांधकाम अद्यापर्यंत पुर्ण केले नाही. त्यामुळे लाखो रुपये देऊन फ्लॅटची बुकिंग करणाऱया ग्राहकांनी त्याच्याकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केली असता, मोरे याने ग्राहकांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. अखेर काही ग्राहकांनी खांदेश्‍वर पोलीसांकडे याबाबत तक्रार  दाखल केली.

सदर तक्रारीवरून पोलिसांनी सुमीत सदास मोरे याच्या विरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका (बांधकाम, विक्री, व्यवस्थापन आणि हस्तांतरण नियमन) अधिनियम 1963 प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणात फसवणुक झालेल्या 9 ग्राहकांनी पोलिसांकडे तक्रार केली असून या प्रकरणात आणखी काही ग्राहकांची फसवणुक झाली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी सुमीत सदास मोरे याने अनेक फ्लॅट हे दोन दोन ग्राहकांना विकून त्यांच्याकडून लाखो रुपये घेतल्याचे देखील उघडकिस आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.