31 जुलै अंतिम मुदत असल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेचे अर्ज तातडीने भरा
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)
तालुक्यातील शेतकरीवर्गाला पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार खरीप हंगाम 2020 साठी पोलादपूर तालुक्यात यावर्षी भात, नाचणी या पिकांचा समावेश करण्यात आला असून् विमा उतरविण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै 2020 देण्यात आलेली आहे, असल्याने तातडीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन तालुका कृषी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत पीक विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्याने 2 टक्के विमा हप्ता रक्कम भरल्यास उरलेली 98 टक्के रक्कम शासन भरणार आहे. शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत नजिकच्या बँकेच्या शाखेत व आपले सरकार सेवा केंद्रात विमा हप्ता ऑॅनलाईन भरणा करता येणार आहे. विमा हप्ता भरताना अर्जासोबत शेतकरयांनी सातबारा व आठ अ उताऱ्यांच्या प्रतींसह बँक खात्याच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डाची छायांकित प्रत, स्वयंघोषित पीक पेरा प्रपत्र, कागदपत्रे शेतकऱ्यांना सादर करावी लागणार आहेत असे कृषी सहायक दत्तात्रय नरुटे कृषी पर्यवेक्षक देविदास काटे यांनी सांगितले.
जिल्हा बँक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, सोसायटी सचिव यांच्याशी पिक विमा योजनेत सहभागासाठी संपर्क साधावा असे सांगण्यात आले आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी 910 रुपये विमा हफ्ता आकारण्यात येणार असून 45 हजार 500 रुपये संरक्षित रक्कम राहील. नाचणी पिकासाठी प्रति हेक्टरी 400 रुपये विमा हफ्ता आकारण्यात येणार असून 20हजार प्रति हेक्टरी रुपये संरक्षित रक्कम आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेनुसार भात व नाचणी पिकांचे प्रतिकूल परिस्थितीमध्ये पेरणी, लावणी न झाल्यास, (खरीप हंगामासाठी) पिकाच्या हंगामामध्ये पूर, पावसाने खंड दिल्यास, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे काढणी पश्चात होणारे नुकसान व वरीलप्रमाणे नैसर्गिक नुकसानीच्या बाबी विमा संरक्षणात समाविष्ट असल्याचे मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील व विजय निकम यांनी सांगितले आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय पोलदपूर यांच्या अधिनस्त पैठण व पोलादपूर दोन मंडळ कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत सर्व गावामध्ये प्रचार प्रसिध्दीचे काम चालू आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मोठया प्रमाणात घ्यावा असे पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी सांगितले.






Be First to Comment