रायगड जिल्ह्यातील आरोग्य सेवेवाबत मनसे आक्रमक
जिल्ह्यात अद्ययावत आरोग्य सुविधा असलेले मोठे रुग्णालय उभारावे
सिटी बेल लाइव्ह / रायगड (धम्मशिल सावंत)
रायगड जिल्ह्यात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक रुग्ण, नागरिक, गर्भवती महिला वेळीच योग्य ते उपचार न मिळाल्याने दगावतात. ही बाब अत्यंत गंभीर आहे. रायगड जिल्ह्यात अद्ययावत आरोग्य सुविधा असलेले मोठे रुग्णालय उभारावे अशी मागणी मनसेचे जिल्हा संघटक संदीप ठाकूर यांनी केली आहे. रायगड जिल्यातील ढिसाळ आरोग्य सेवेबाबत मनसे आक्रमक झाली असून मनसेचे रायगड जिल्हा संघटक संदीप ठाकूर यांनी आरोग्य मंत्री राजेशजी टोपे यांना निवेदन दिले आहे.
अलिबाग जिल्हा रुग्णालयात गरोदर महिलेला आय सी यु युनिट तसेच नवजात बालकाला एन आय सी यु उपलब्ध न करता मुंबईला पाठवातात. पेण तालुक्यातील अनेक करोना बाधित रुग्णांपैकी अनेकांना खाजगी दवाखान्यात पाठविण्यात येते. सदर रुग्ण त्यामुळे खुलेआम फिरताना दिसून येत आहेत.
पेण तालुक्यातील सावरसई येथे करोना रुग्णांकरिता कोव्हिडं सेंटर उभारले असून तेथे स्वँब न घेता 5-6 दिवस उपचार करून रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे.
खाजगी दवाखान्यात साध्या आजाराला कोव्हिडं अँटिबॉडी टेस्ट करायला लावून त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून आपल्या आरोग्य विभागाच्या भरारी पथकाला रवाना करुन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सदर निवेदनात त्यांनी केली आहे.
यावेळी त्यांच्या सह समीर पाटील, प्रफुल्ल पाटील, अजिंक्य पाटील, ज्ञानेश्वर ठाकूर, गणेश पाटील, प्रवीण म्हात्रे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.






Be First to Comment