शारदीय नवरात्र सातवी माळ
आज सप्तशृंगी माता सोळा श्रृंगार करून आली आहे. आजचं रूप काहीसं दुर्लक्षिलेलं किंबहुना त्याचा उपहासच आजवर केला गेला आहे.
आजचं रूप आहे “किन्नर”, समाजातील सर्वात दुर्लक्षित आणि शोषित घटक. काही जनुकीय चुकांमुळे जन्माला येतानाच हे लोक शारीरिक न्यूनता घेऊन येतात आणि आयुष्यभर न केलेल्या गुन्ह्याची जन्मठेप भोगत रहातात.
लहानपणापासूनच अशी व्यक्ती हेटाळणीची धनी ठरते. तिला समजून घेण्यात तिचे आई वडीलही पुरे पडत नाहीत. समाज अशा व्यक्तीचा पुरेपूर गैरफायदा घेतो. सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्कही अशा व्यक्तीला मिळत नाही. शाळेत, खेळाच्या मैदानावर कुठेच तिला मोकळेपणाने वावरता येत नाही. शिक्षण पूर्ण करता येत नाही, उपजीविकेसाठी कुठलेही कौशल्य आत्मसात करता येत नाही, मग त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी एकच मार्ग उरतो तो म्हणजे भीक मागणे. आणि ही भीक देवीच्या बहुधा यल्लम्मा देवीच्या नावाने मागतात. बहुतेकसे किन्नर अतिशय छान नटलेले असतात आणि त्यातही जे नाजूक चणीचे असतात ते तर वेगळे ओळखणंही कठीण असतं.
बहुसंख्य लोकांना या किन्नरांची किळस किंवा भीती वाटते आणि त्यामुळेच त्यांना भीक दिली जाते. सरळ बोटाने तूप निघत नसेल तर बोट वाकडं करण्याची कला यांना अवगत असते त्यामुळे ते अनेक वाईट मार्ग अनुसरून पैसे कमावतात. घरातील शुभ प्रसंग-विवाह, बाळाचा जन्म अशा प्रसंगी टोळीने येऊन यजमानांना अक्षरशः लूटतात.
अर्थातच यांच्यातही काही चांगले लोक आहेत, जे उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करायचा आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. लक्ष्मीनारायण त्रिपाठी सारखी किन्नर व्यक्ती एक यशस्वी वक्ता आहे. काही किन्नरांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले आहे. संधी मिळाली तर ह्या व्यक्तीपण चांगले काम करतात.पण संधी मात्र दिली पाहिजे.
आजच्या काळात माणसाला जात, धर्म, लिंग याच्या पलिकडे जाऊन समानतेची वागणूक देणं, हीच मला वाटतं, देवीची खरी उपासना ठरेल.
सौ. पौर्णिमा दीक्षित
सेक्टर १५-ए,नवीन पनवेल
Be First to Comment