Press "Enter" to skip to content

प्रकाश आंबेडकरांनी वाहिली आदरांजली

वंचित बहुजन महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सुमनताई कोळी यांचे निधन

सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे (धम्मशिल सावंत)

वंचित बहुजन महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव तथा कोकण निरीक्षक, कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे वयाच्या 63 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यामुळे आंबेडकरी बहुजन चळवळीची मोठी हानी झाली असल्याची शोकाकुल प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.

सुमन ताईं कोळी सातत्याने समाजाचे प्रश्न मांडत असत. कोकणात त्यांनी महिलांच्या माध्यमातून मोठा गट तयार केला होता. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक रायगडमधून लढवली होती. त्यांच्या जाण्याने आमच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे. ताईंच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. अशा शब्दात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली. बुध्द, कबीर, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांची भुक आहे. असे चळवळीशी प्रामाणिक व एकरुप होणारे कार्यकर्ते निर्माण करण्याचे कार्य सुमनताईंच्या हातून घडले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी रायगड रत्नागिरी मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीला अधिकाधिक बळ व उभारी देण्याचे काम केले. कुलकायदा, गावठाण, झोपडपट्टी या प्रश्नावर आंदोलन करीत जमीनहक्क परिषदेच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिला. आदिवासी बांधवांचे प्रश्न व समस्या सोडविण्यावर देखील त्यांचा विशेष भर होता. समाजकारण करीत असताना त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्च शिक्षित केले. परिवर्तनाच्या चळवळीत काम न करणारी माणसे जिवंत असून मेल्यासारखी असतात. तर परिवर्तनाच्या चळवळीत काम करणारी माणसे मरुन देखील जिवंत असतात. सुमनताईंनी परिवर्तनाच्या चळवळीत स्वताला झोकून देऊन
सातत्याने काम केले. सत्यशोधक चळवळ व विचारांचा वारसा खर्‍याअर्थाने पुढे नेण्याचे काम त्यांच्या हातून घडल्याची प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली. बहुजन महापुरुषांच्या विचारांनी प्रेरीत होउन महापुरुषांचे कार्य व विचार आचरणात आणून पुरोगामी चळवळीला गतीमान करण्यासाठी त्यांनी आजवर दिलेले योगदान वाखाणण्याजोगे असेच आहे. आंबेडकरी चळवळीला खर्‍या अर्थाने संघटनात्मकदृष्ट्या बलवान व सामर्थ्यवान बनवायचे असेल तर बहुजन समाज या चळवळीशी एकरुप झाला पाहिजे या उदात्त भावनेतून त्या अहोरात्र काम करत होत्या. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीप्रणीत संविधानिक मुल्यांचा जिवनात अंगिकार करुन मार्गक्रमण करीत असताना त्यांनी तत्वाशी कधीही तडजोड केली नाही. सुमनताईंनी आंबेडकरी बहुजन चळवळीचे काम तळागळात, खेड्यापाड्यात व घराघरात नेत प्रत्येक माणसाच्या मनामनात महापुरुषांच्या विचारांचे बिजारोपन करण्याचे महत्तम असे कार्य केले. तसेच शोषीत, वंचीत, पिडीत, गोरगरीब, दिनदुबळ्या, मागास,  सर्वसामान्य घटकांवर झालेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम सुमनताईंनी केले. आंबेडकरी बहुजन चळवळ वृध्दीगंत करण्यासाठी त्यांनी केलेले कठोर परिश्रम, विस्तारलेले समाजसेवेचे अपार क्षितीज यामुळे त्या सर्वपरिचित होत्या. त्यांनी सातत्याने लोकाभिमुख व समाजाभिमुख कामे केली. माणसे जोडण्याची व प्रामाणिकपणे हाताळण्याची त्यांची हातोटी होती. स्वताच्या पोटात भुक असताना दुसर्‍याच्या भुकेची चिंता करणार्‍या व चळवळीशी निष्ठा बाळगणार्‍या  कार्यकर्त्यांची आज आंबेडकरी बहुजन चळवळीला गरज असताना त्यांचे अकाली निघून जाणे सर्वांच्याच मनाला चटका लावून गेले.सुमनताई नेहमीच आंबेडकरी बहुजन चळवळीचा सर्वदूर प्रसार व प्रचार होणेकरीता सतत प्रयत्नशिल होत्या. आदिवासी, कातकरी, ठाकूर, धनगर समाजापर्यंत महापुरुषांचे विचार पोहचविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वर्षानुवर्ष दूर राहिलेल्या आदिवासी समाजघटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुमनताई कोळीनी आदिवासीवाड्यापाड्यात लोकशिक्षण व महापुरुषांची क्रांतिकारी वैचारिक चळवळ गतीमान होणेकामी विशेष योगदान दिले. त्यांच्या जाण्याने बहुजन चळवळीचे खूप मोठे नुकसान झाले असल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. सुमनताईंच्या जाण्याने तरुण कार्यकर्त्यांनी आपला उत्तम मार्गदर्शक व जणू आपली माय हरपली असल्याची शोकाकुल भावना व्यक्त केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.