सुरक्षेच्या साधनांसह इतरही गोष्टींची पूर्तता करणार
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
नागोठण्याजवळील सुकेळी येथील बी.सी. जिंदाल चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातील त्यांच्या सुरक्षेच्या व इतर काही कारणांसाठी सोमवारी (दि.२७) दुपारपासून केलेले काम बंद आंदोलन अखेर आज सकाळी व्यवस्थापनासोबत झालेल्या बैठकीतील आश्वासनानंतर मागे घेतले. जिंदाल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीआज मंगळवारी (दि.२८) दुपारी १२ वाजता काम सुरु केल्याने कंपनी कामगार, त्यांचे कुटुंबीय व परिसरांतील नागरिकांची आता गैरसोय होणार नसल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या काळात जिंदाल रुग्णालयात इतर आजारांवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. या रुग्णांमध्ये चुकून जर का कोरोना बाधित रुग्ण असेल तर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही कोरोन संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने पुरविणे या मुख्य मागणीसह कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देणे, भविष्य निर्वाह निधी, वार्षिक वेतन वाढ या जुन्याच मागण्यांसह अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.
जिंदाल रुग्णालयात आज सकाळी झालेल्या या बैठकीला जिंदाल कंपनीचे वरिष्ठ अधिकारी के.के. पांडे, जिंदाल रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रताप राठोड यांच्यासह रुग्णालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. जिंदाल रुग्णालयात सध्या तीन डॉक्टर्स वगळता वेगवेगळ्या विभागात १८ कर्मचारी असून त्यांच्या अनेक मागण्या गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण होत नसल्यानेच अधून मधून उफाळून येणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा असंतोषाला जिंदालच्या व्यवस्थापनाला सामोरे जावे लागते. मात्र या बैठकीनंतर आता तरी आमचा प्रश्न मार्गी लागेल अशी माफक अपेक्षा जिंदाल रुग्णालयाच्या या कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.






Be First to Comment