Press "Enter" to skip to content

शारदीय नवरात्र
दुसरी माळ

शारदीय नवरात्र
दुसरी माळ

आज दुसरी माळ. आज ती अंबिका बहिण होऊन हितगुज करत आहे. आपल्या बालपणीचा मोठा काळ तिच्या अस्तित्वाने व्यापलेला असतो. ती छोटी असो वा मोठी, आईचं प्रतिरुप असते. तीच माया, तेच प्रेम तिच्याठायी प्रतित होत असतं.
नकळत्या वयापासून ती आपली सोबतीण असते. आपल्या प्रत्येक गोष्टीची भागीदार असते. खाऊ, खेळणी, कपडे, पुस्तकं, इतकंच कशाला? आई-बाबांची माया सुध्दा तिच्याबरोबर वाटून घेतलेली असते. ती असते आपली गुपितं जपणारी पेटी, हितगुज करण्याची हक्काची जागा. ती आपल्याला जपत असते, सांभाळून घेत असते. आपल्यासाठी सगळ्या जगाशी ती भांडू शकते. आपल्याशी पण ती भांडत असतेच पण त्याहून जास्त प्रेम करत असते. आपलं आणि तिचं एक वेगळंच विश्व असतं, ज्यात इतर कुणालाही प्रवेश नसतो. ती आणि आपण crime partner असतो.
मोठी बहीण म्हणजे प्रति आईच, तर छोटी बहीण म्हणजे लाडूबाई. मोठी समजून घेणारी, तर छोटी तिचा मुद्दा व्यवस्थित पटवून देणारी. मोठी जरा नमतं घेणारी तर धाकटी नमवणारी.
त्यातही बहिण-भाऊ आणि बहिणी-बहिणी यांच्यातील नात्यातही खूप फरक असतो. भावा – बहिणीचं नातं हे पृथ्वी आणि चंद्रासारखं, दूर असूनही एकमेकांभोवती फिरत रहाणारं. आपापल्या संसारात रमूनही एकमेकांची काळजी करणारं. तर बहिणींचं प्रेम म्हणजे गंगा-यमुनेचा संगम. वेगवेगळ्या दिशांनी वाहूनही शेवटी एक होणाऱ्या. बहिणी एकमेकींच्या खास मैत्रिणीही असतात. चिरोट्यासारखे खुसखुशीत पदर बहिणींच्या नात्याला असतात. अनेक पदरी अनेक ढंगी असं हे नातं अलवार, नाजूक तरीही चिवट असतं. प्रत्येक व्यक्तीला एकतरी बहिण आणि तिचं प्रेम मिळावं ही जगदंबे चरणी प्रार्थना.

  • सौ. पौर्णिमा दीक्षित
    सेक्टर १५-ए, नवीन पनवेल
    फोन-९८२०५८५६२५

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.