Press "Enter" to skip to content

संगीत प्रेमी चोर स्पायडर मॅन अडकले पोलिसांच्या जाळ्यात : खारघर पोलीसांची कामगिरी

सिटी बेल | पनवेल |


नवी मुंबई पोलिसांच्या परिमंडळ दोन अंतर्गत येणाऱ्या खारघर व पनवेल तालुका पोलिसांनी एकाच वेळी चार गुन्ह्यांची उकल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद घेऊन गुन्हे अन्वेषणचे बाबत माध्यमांना अवगत केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे,पनवेल तालुका पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र दौंडकर, खारघर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान शिंदे उपस्थित होते. या वेळी खारघर पोलिसांनी पकडलेल्या संगीत प्रेमी स्पायडरमॅन गॅंग चे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय बनत आहे.

खारघर परिसरात गेल्या सहा ते सात महिन्यात घरफोडीची प्रकरणे वाढली होती. यामध्ये खिडक्यांना ग्रील नसलेल्या घरांना टार्गेट करण्यात येत होते. गुन्हेगारीचे स्वरूप पाहता एकाच टोळीने धुमाकूळ घातल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज होता. खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण व गुन्हे शाखा कक्ष 3 यांचे एकत्रित पथक तयार करून तपास सुरू केला.

तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाअंती ही टोळी गोवंडी येथून येत असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही टीम नी गोवंडी येथे जाऊन गुप्तपणे पाळत ठेवत आरोपींच्या बाबत अधिक माहिती काढली. खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी खारघर येथील सेक्टर 34 व 35 येथून तीन आरोपींना अटक केली. यामध्ये मुंब्रा येथे राहणारा सैफ ईसा शेख वय वर्षे एकोणीस, जो सध्या गोवंडी येथे वास्तव्यास आहे,या म्होरक्या ला अटक करण्यात आली.

उंच इमारतींवर पाइपच्या सहाय्याने चढण्यात हा इसम वाकबगार आहे. सज्जे,खिडक्या यांचा आधार घेत तो चार पाच मजली इमारत सहज चढून जातो. त्याच्यासोबत गोवंडी येथे राहणाऱ्या शोएब वारिस कुरेशी व सिराज नईम शहा यांना देखील अटक करण्यात आली. अधिक तपास केला असता या तिघांनी सात गुन्हे केले असल्याचे कबूल केले. त्यांनी चोरीचा माल मोहम्मद उमर मोहंमद युसुफ शेख राहणार गोवंडी याला विकल्याचे सांगितले त्यानुसार मोहम्मद उमर मोहंमद युसुफ शेख याला देखील अटक करण्यात आली आहे.या गुन्ह्यात वापरण्यात येत असलेले वाहन देखील पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांनी या तिघांकडून सोन्याचे दागिने,हिऱ्याची अंगठी,10 मोबाईल फोन, तीन लॅपटॉप,एक हार्ड डिस्क,आणि विशेष म्हणजे एक गिटार ताब्यात घेतली आहे.त्यामुळे स्पायडरमॅन संगीत प्रेमी म्हणावा की वाद्यांना चांगले भाव आले आहेत? ते पुढील तपासात निष्पन्न होईल.तूर्तास गुन्हेगार विलगीकरण कक्षात असल्याचे व पो नी संदीपान शिंदे यांनी सांगितले.

या गुन्ह्याची उकल करणाऱ्या टीम मध्ये व पो नी संदीपान शिंदे,गुन्हे कक्ष 3 चे व पो नी शत्रुघ्न माळी, स पो नि मानसिंग पाटील,हवालदार बाबाजी थोरात,शंकर जाधव,संतोष भोकरे,प्रशांत जाधव,रमेश वैद्य,सचिन धनवटे, गणेश चौधरी,लवकुश शिंगाडे,प्रविण पाटील,वैभव शिंदे,इशांत खरोटे, पवार,नेवारे, कोळी,मोरे सहभागी होते.


Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.