Press "Enter" to skip to content

कर्जत तालुक्यातील सावेले येथे वयोवृद्धाचा खून, एक जखमी

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील सावेले ग्रामपंचायत हद्दीतील सावेले गावात असलेल्या म्हशींच्या तबेल्यावर काम करणाऱ्या वयोवृद्ध कामगाराचा खून झाला आहे. या घटनेत तबेल्याच्या मालकाला मारण्याचा प्रयत्न मध्यरात्री नंतर आलेल्या चार अज्ञात मारेकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणात कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

कर्जत तालुक्यातील सावेले गावातील आरिफ हाजीमिया मुल्ला यांचा म्हशीचा तबेला आहे. त्यांच्याकडे गणपत रावजी जाधव हे अनेक वर्षांपासून कामगार म्हणून काम करीत होते. मंगळवारी रात्री दीड च्या सुमारास त्या तबेल्यावर चार अज्ञात इसम आले आणि त्यांनी तेथे कॉटवर झोपलेल्या आरिफ हाजीमिया मुल्ला यांच्या अंगावर चादर टाकून तोंड आणि गळा दाबण्याचा प्रयत्न केला. डासांचा त्रास होऊ नये म्हणून अंगावर चादर घेऊन झोपलेले आरिफ मुल्ला यांची देहयष्टी मजबूत असल्याने त्यांनी तोंड दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार अज्ञात व्यक्तींना आपल्या ताकदीने दूर लोटून दिले.

मात्र त्यावेळी आरडाओरडा करीत असलेले 75 वर्षीय कामगार गणपत रामजी जाधव यांच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी मारहाण केली. तर अज्ञात इसमांच्या तावडीतून सुटल्यानंतर त्यांच्या डोक्यात त्या अज्ञात इसमांनी लोखंडी हत्यारांनी वार केल्याने आरिफ मुल्ला आणि गणपत जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिले. त्या तबेल्यावर आरिफ यांचा मुलगा सादिक याला आरिफ हे फोन करून दूध पाजण्यासाठी बोलावत असतात. वडिलांचा फोन आला नाही म्हणून सादिक आरिफ मुल्ला हा तबेल्यावर पोहचला असता त्याला त्याचे वडील आरिफ हाजीमिया मुल्ला हे बेशुद्ध तर आणि कामगार गणपत रामजी जाधव हे रक्ताच्या थारोळ्यात पडून असल्याचे दिसून आले.

याबाबत सादिक मुल्ला यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पहाटे साडे चार वाजता कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुवर्णा पत्की या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचल्या. तेथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णलयात उपचार करण्यासाठी आणले असता 75 वर्षीय गणपत रामजी जाधव यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर दुसरी जखमी व्यक्ती आरिफ मुल्ला यांच्यावर उपचार सुरू केले.

जखमी व्यक्ती आरिफ मुल्ला

या घटनेची माहिती होताच शेकडो लोक कर्जत पोलीस ठाण्यात जमले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलोस अधीक्षक अशोक दुधे यांनी पहाटेच माहिती घेऊन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधिक्षक संजय शुक्ला यांना तातडीने घटनास्थळी पाठविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतच्या पोलीस निरीक्षक पत्की यांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अलिबाग येथून डॉग स्कॉड देखील बोलावून घेतला आणि अज्ञात इसमांनी गणपत जाधव यांच्या खून केल्यानंतर काही धागेदोरे सोडले आहेत काय? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत पोलीस ठाण्यात जखमी आरिफ मुल्ला यांच्या फिर्यादीनंतर गणपत रामजी जाधव यांच्या खून अज्ञात इसमांनी केला असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

मयत गणपत जाधव यांच्या डोक्यात सहा इंचाचा वार असून तो एक इंच खोल होता. तर या खून प्रकरणी फिर्यादी आरिफ मुल्ला यांनी केवळ चार अज्ञात इसमांनी हल्ला केला असून अंधारात आम्हाला ते दिसले नाहीत. असे आपल्या जबाबात म्हटले आहे. पोलिसांनी संशयित म्हणून काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.