Press "Enter" to skip to content

तटकरेंचा कोमेजला चेहेरा बोलत होता “ऑल इज नॉट वेल !”

खासदार सुनील तटकरेंच्या बैठकीला काँग्रेस शिवसेनेचा ठेंगा : डॅमेज कंट्रोल साठी तटकरेंची पत्रकार परिषद

सिटी बेल | कळंबोली |

रायगड जिल्ह्यात महा विकास आघाडी मध्ये सारेच अलबेल नसल्याच्या घटना गेल्या पंधरा दिवसात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर किमान पनवेल-उरण मध्ये महाविकास आघाडी एकत्र राहील असा विश्वास देण्याच्या उद्देशाने खासदार सुनील तटकरे यांनी कळंबोली येथे शुक्रवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषद ठेवली होती. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची बैठक घेण्याचा त्यांचा मानस होता परंतु या बैठकीत शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी उपस्थित राहण्याचे नाकारल्यामुळे अखेर पक्षाची आढावा बैठक गुंडाळून त्यांना पत्रकार परिषदेस सामोरे जावे लागले.

पत्रकार परिषदेत सुनिल तटकरे यांनी पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्रामध्ये संघटन वाढविण्याची गरज असल्याचे सूतोवाच केले. पक्षांतर्गत निवडणुकांच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका तूर्तास पटलावर नसल्याचे सांगत मोर्चेबांधणी करण्याची मात्र नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी मान्य केले. महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या भूमिकेबाबत अत्यंत सावध उत्तरे देत सुनील तटकरे यांनी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांवर तोंडसुख घेण्याचे कटाक्षाने टाळले. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे हे महाविकास आघाडी जशी राज्यात आहे तशीच रायगड जिल्ह्यात होणार याबाबत ठाम असले तरीदेखील काँग्रेसने मात्र एकला चलो रे चा नारा दिला आहे हे बहुधा विसरले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका पक्ष प्रवेश सोहळ्याला आलेले काँग्रेस चे कोकण प्रभारी माजी मंत्री नसीम खान यांनी देखील युत्या आणि आघाड्या पुष्कळ झाल्या, स्वबळावर पनवेल महानगरपालिका जिंकण्यासाठी सज्ज व्हा ! असा कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना या महत्त्वाच्या दोन घटकांशी चर्चा करण्यापूर्वीच महाआघडीची घोषणा करणे म्हणजे त्यांना गृहीत धरण्याचा प्रकार वाटतो. म्हणूनच काँग्रेसच्या रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी, आम्हाला कोणी गृहीत धरू नये अशा स्वरूपाचे जर वक्तव्य केले असेल तर ते योग्य आणि पार्टी लाइन ला धरून होते, त्यामुळे त्या वक्तव्याचा निषेध करणे हा राष्ट्रवादी काँग्रेस चा आततायीपणा होता असे म्हणावे लागेल.

खासदार सुनील तटकरे यांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांचे नेहेमीचे हजर जबाबी आणि उत्साही रूप पाहायला मिळाले नाही. महाविकास आघाडी मधील बेबनाव त्यांनी मान्य केला नसला तरी त्यांचा कोमेजला चेहेरा ऑल इज नॉट वेल ! हेच सांगून गेला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.