पोलादपूर पोलीस,ग्रामस्थ,आरोग्य कर्मचाऱ्यांची मानवसेवा
सिटी बेल लाइव्ह / पोलादपूर (शैलेश पालकर)-
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील लोहारमाळ येथे गेल्या महिनाभरापासून विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या वृध्दाची प्रकृती आज सकाळी चिंताजनक झाल्यानंतर पोलादपूर पोलीस आणि लोहारे ग्रामस्थांनी त्याला खासगी टेम्पोमधून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये आणले. ग्रामीण रूग्णालयामध्ये कोरोना शब्द माहिती नसलेल्या या विमनस्क वृध्दावर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी थोडयाशा कटूतेनंतरही तत्परता दाखविल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यास माणगांव उपजिल्हा रूग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहे. यामुळे या यंत्रणेसोबत ग्रामस्थांची मानवसेवाही कौतुकास्पद ठरली आहे.
कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण जगभर आरोग्याची काळजी घेतली जात असताना कोरोना शब्दच माहिती नसलेला एक विमनस्क वृध्द गेल्या महिनाभरापासून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरील लोहारमाळ येथे रस्त्याच्या कडेला बसून तसेच झोपून भिक मागून खात वावरत असल्याचे दिसून येत होते. मात्र, सोमवारी सकाळी या वृध्द व्यक्तीची प्रकृती खालावल्याने त्या जीवंत असलेल्या वृध्दाच्या शरिरावर किडे पसरल्याचे किळसवाणे दृश्य पाहूनही पोलीसांच्या मदतीने ग्रामस्थांनी त्याला पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये एका टेम्पोने नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी हवालदार दीपक जाधव, हवालदार रूपेश पवार, पोलीस शिपाई विनोद महाडीक व पोलीस चालक दराडे यांच्यासह चंद्रकांत नरे, ज्ञानेश्वर जाधव आणि टेम्पोरिक्षाचालक राकेश यांनी सदर वृध्दाला ग्रामीण रूग्णालयामध्ये नेले.
ग्रामीण रूग्णालयामध्येही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वृध्दाची ही किळसवाणी अवस्था पाहून अन्यत्र दाखल करण्याचा सल्ला देण्याची इच्छा झाली. मात्र, काही वेळानेच रूग्णालयाच्या ग्राऊंडवर वृध्दाच्या शरीरावरील किडे दूर करून महिला आरोग्य कर्मचारी महाडीक व पवार यांनी परिचारिका सुकदरे आणि कोळी यांच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले आणि लोहारे येथील ग्रामस्थांनी वृध्दाचे केस व दाढी कापून त्याला आंघोळी घालून त्याला नवीन कपडेही नेसविले. यानंतर पोलादपूर ग्रामीण रूग्णालयातील डॉ.वाघ आणि डॉ. सलागरे यांनी त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करून त्याची प्रकृती स्थिर केली. मात्र, त्याची श्वसनक्रिया सुरळीत होऊन अन्य वैद्यकीय चाचण्या घेण्यासाठी त्याला माणगांव उपजिल्हा रूग्णालयामध्ये संपर्क साधून तेथे हलविण्यासाठी ऍम्ब्युलन्सची व्यवस्था करून रवाना केले आहे.
जगाला घाबरविणाऱ्या कोरोना शब्दाची माहितीही नसलेल्या या वृध्दाने मास्क, सॅनिटायझरचा वापर कधी केला नव्हता आणि आंघोळ केली नव्हती अथवा अंगावरचे कपडेही कधी धुतले नव्हते, अशा अवस्थेत त्याला रूग्णालयामध्ये दाखल करणारे पोलीस, लोहारे ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचारी व डॉक्टर्स यांनी आज माणुसकीचे आगळेवेगळे दर्शन घडविले. दरम्यान, सदर विमनस्क वृध्दाचे आडनाव सकपाळ असून तो पोलादपूर तालुक्यातील आडावळे गावातील अविवाहित असल्याने एकटा असल्याची माहिती मिळाली आहे.






Be First to Comment